बँकेचा पत्ता विचारला, पैसे खाली टाकले अन् सेकंदात मंगळसूत्र गायब... नाशिकच्या कॉलेज रोडवरील घटना...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ६ जून - नाशिक शहरातील उच्चभ्रू आणि गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवर एका ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेचे लक्ष विचलित करून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञात भामट्यांनी संगनमत करून ही चोरी केली. याप्रकरणी नाशिक शहरातल्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे खाली पडल्याचे सांगून केले 'टार्गेट'

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केसरबाई अमृता इंगोले (वय ६० वर्षे, व्यवसाय - गृहणी, रा. कुलकर्णी बाग, कौशल्य हॉस्पिटल समोर, कॉलेज रोड, नाशिक) या काल शुक्रवार, दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वाजेच्या सुमारास कॉलेज रोडवरील बिग बाजारसमोरील 'हॉट चिप्स' आणि 'मॅकडोनाल्ड' दुकानाच्या परिसरातून पायी जात होत्या.

त्यावेळी दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने केसरबाई यांना बँकेचा पत्ता विचारून बोलण्यात गुंतवले. संभाषण सुरू असतानाच, त्या भामट्याने हुशारीने स्वतःच्या हातातील काही पैसे खाली टाकले आणि "मावशी तुमचे पैसे खाली पडले आहेत," असे सांगून केसरबाई यांचे लक्ष विचलित केले. केसरबाई या खाली पडलेले पैसे पाहण्यासाठी जशा खाली वाकल्या, तसा डाव साधत तिथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या अज्ञात भामट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लबाडीच्या इराद्याने, त्यांच्या संमतीशिवाय जोरात ओरबाडून लंपास केले. गळ्याला हिसका बसल्याने केसरबाई काही समजण्याच्या आतच दोन्ही आरोपी गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले.

Advertisement

सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल; सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

भरदिवसा कॉलेज रोडसारख्या व्हीआयपी परिसरात चोरी झाल्याने केसरबाई यांनी तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. ५ जून रोजी दुपारी १५:२४ वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध गु. र. क्र. १५१/२०२६ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

या  प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस हवालदार गांगोडे हे करत आहेत. तर गुन्ह्याची नोंद ठाणे अंमलदार पोलीस हवालदार गायकवाड यांनी केली आहे.

​कॉलेज रोडवरील हॉट चिप्स आणि मॅकडोनाल्ड परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलीस यंत्रणेकडून तपासले जात असून, संशयित भामट्यांचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नाशिक शहरात पुन्हा एकदा अशा प्रकारे नजर चुकवून दागिने पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.