मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासह जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी (Asian Games) भारतीय टी-२० संघाची अधिकृत घोषणा केली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत काही अत्यंत धाडसी आणि चक्रावून टाकणारे निर्णय घेण्यात आले आहेत. नुकताच भारताला टी-२० विश्वचषक २०२६ चा विजेता बनवणारा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याला मोठा धक्का देत निवड समितीने थेट कर्णधारपदावरूनच डच्चू दिला आहे. त्याच्या जागी टी-२० संघाची धुरा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.
श्रेयस अय्यरचे 'कॅप्टन' म्हणून धमाकेदार पुनरागमन!
डिसेंबर २०२३ पासून भारतीय टी-२० संघातून सातत्याने बाहेर असलेल्या श्रेयस अय्यरने थेट कर्णधार म्हणूनच संघात पुनरागमन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यासारखे दिग्गज पर्याय उपलब्ध असतानाही निवड समितीने अय्यरच्या नेतृत्व कौशल्यावार पूर्ण विश्वास दाखवला आहे.
भारतीय टी-२० संघात सध्या अनेक आक्रमक सलामीवीर आणि फिनिशर्स आहेत. मात्र, मधल्या फळीत डाव सावरणारा आणि दबावाच्या परिस्थितीत संथ न खेळता धावांची गती कायम ठेवणारा खेळाडू हवा होता, ही उणीव श्रेयस अय्यर भरून काढेल, असा विश्वास निवड समितीला आहे. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचा आणि नेतृत्वाचा फायदा भारतीय संघाला नक्कीच होईल. दुसरीकडे, भारताला विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव सध्या अत्यंत खराब फॉर्मशी झुंजत असल्यामुळेच त्याला संघातून आणि कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास; थेट आंतरराष्ट्रीय संघात एन्ट्री!
या संघ निवडीतील सर्वात मोठा, ऐतिहासिक आणि कौतुकास्पद निर्णय म्हणजे अवघ्या १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या अद्भूत फलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला थक्क करणाऱ्या वैभवला त्याच्या कष्टाचे सर्वात मोठे फळ मिळाले आहे.
वैभव सूर्यवंशीची आयपीएल २०२६ मधील तुफानी आकडेवारी:
एकूण धावा: १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक ७७६ धावा करून पटकावली 'ऑरेंज कॅप'.
षटकार: एकाच हंगामात ठोकले विक्रमी ७२ षटकार.
स्ट्राइक रेट: तब्बल २३७.३० च्या तुफानी स्ट्राइक रेटने धावा कुटल्या.
वैभवच्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीमुळे निवड समितीने त्याला कोणत्याही देशांतर्गत अनुभवाच्या प्रतीक्षेत न ठेवता थेट भारतीय संघात खेळवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे.
भारतीय टी-२० संघ (घोषित स्क्वॉड)
१. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.
२. आशियाई क्रीडा स्पर्धा आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, वैभव सूर्यवंशी.
टीम इंडियाचे आगामी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक
भारताचा आयर्लंड दौरा (२ टी-२० सामने):
२६ जून : पहिला टी-२० सामना (बेलफास्ट)
२८ जून : दुसरा टी-२० सामना (बेलफास्ट)
भारताचा इंग्लंड दौरा (५ टी-२० सामने):
०१ जुलै : पहिला टी-२० सामना (चेस्टर-ली-स्ट्रीट)
०४ जुलै : दुसरा टी-२० सामना (मँचेस्टर)
०७ जुलै : तिसरा टी-२० सामना (नॉटिंगहॅम)
०९ जुलै : चौथा टी-२० सामना (ब्रिस्टल)
११ जुलै : पाचवा टी-२० सामना (साऊदॅम्पटन)