१८ किमीचा डोंगर अवघ्या काही मिनिटांत पार करत ड्रोनने पोहोचवली लस... दुर्गम भागात हायटेक आरोग्य सेवा...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) ६ जून  -  “दुर्गम, आदिवासी आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक भागांतील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य आता जलदगतीने पोहोचणार असून, यामुळे आरोग्य सेवा वितरण व्यवस्थेत एक क्रांतिकारी बदल घडून येईल,” असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांसाठी सुरू करण्यात आलेल्या 'ड्रोनद्वारे आरोग्य सेवा वितरण प्रकल्पा'चे लोकार्पण डॉ. मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि आयआयटी मुंबई (IIT Mumbai) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा अभिनव प्रकल्प साकारण्यात आला आहे.

१८ किलोमीटरचा पहिला मार्ग यशस्वी

या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर धडगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बिलगाव ते सावर्या दिगर या सुमारे १८ किलोमीटर अंतराच्या डोंगराळ मार्गावर ड्रोन सेवा सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक सेवेचा फायदा धडगाव तालुक्यातील झापी, बिलगाव, रोषमाळ तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मांडवा आणि जंगठी या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या ३३ गावांमधील २१ हजारांहून अधिक नागरिकांना होणार आहे.

Advertisement

पावसाळ्यातील अडचणींवर मात

अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांमधील नर्मदा नदीकाठावरील अनेक गावे पावसाळ्यात संपर्कविहीन होतात. पूरस्थिती किंवा रस्ते संपर्क खंडित झाल्यास तेथे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवणे मोठे आव्हान असते. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे औषध पुरवठ्यासोबतच रुग्णांच्या प्रयोगशाळा तपासणीसाठी आवश्यक असलेले रक्ताचे नमुने (Samples) देखील अल्पावधीत मुख्य रुग्णालयांपर्यंत आणणे शक्य होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविण्याचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

या लोकार्पण सोहळ्याला आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व आरोग्य विभागाचे डॉक्टर उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.