सर्पदंशावर प्रभावी उपचार होणार... मुंबईत झाली महत्त्वाची बैठक...

Share:
Main Image
Last updated: 07-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून  -  सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (HTRI) आणि घाना सरकारच्या 'सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च' (CPMR) यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे शास्त्रीय प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याचा सविस्तर आढावा घेतला.

सर्पदंशाच्या समस्येवर सखोल चर्चा

आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांमध्ये सर्पदंश हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर, सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेवर स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध असणाऱ्या उपचारांची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली. दोन्ही संस्थांनी वनस्पतीजन्य (हर्बल) औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे, 'झेब्राफिश' आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे आणि संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.

Advertisement

संशोधक आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार

हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात म्हणाल्या, "जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक भागीदारी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नवोन्मेषी संशोधनाला चालना मिळेल." या प्रस्तावित सहकार्यांतर्गत संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त अभ्यास आणि तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) यासंदर्भात संयुक्त प्रस्ताव तयार केले जाणार आहेत, ज्यामुळे युवा वैज्ञानिकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय करून घेता येईल.

उच्चस्तरीय शिष्टमंडळाची उपस्थिती

या बैठकीत हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात, अजित जगताप, मृणाल घाग सावंत यांच्यासह घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सहभाग घेतला. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग आदी मान्यवरांचा समावेश होता. ही बैठक भारत-आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीचे एक आशादायी उदाहरण ठरेल, असा विश्वास दोन्ही देशांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Advertisement

Comments

No comments yet.