मुंबई, (प्रतिनिधी) ७ जून - महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रातील इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचा उद्देश
पर्यटन क्षेत्र हे सध्या देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक आहे. या क्षेत्रात व्यवसाय विस्तार, स्वयंरोजगार आणि आर्थिक विकासाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ राज्यातील अधिकाधिक तरुणांना मिळावा तसेच त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करता यावे, या उद्देशाने या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे डिझाईन करण्यात आले आहे.
या व्यावसायिकांना घेता येणार भाग:
या प्रशिक्षण कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, टुरिस्ट गाईड्स (पर्यटक मार्गदर्शक), कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे नवउद्योजक सहभागी होऊ शकतात.
डिजिटल मार्केटिंग आणि शासकीय योजनांचे मिळणार धडे
प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान सहभागींना व्यवसाय उभारणी, प्रभावी व्यवसाय नियोजन (Business Planning), आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग तसेच शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, पर्यटन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.
अधिक माहिती व संपर्कासाठी:
या उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी ९११२२२८७७३ या अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे 'अमृत' संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.