खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळताय? कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका...

Share:
Main Image
Last updated: 06-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ जून - मुंबईतील एका प्रसिद्ध वडापाव विक्रेत्याकडून अन्न पॅक करण्यासाठी (बांधण्यासाठी) आणि ग्राहकांना वाढण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर केला जात असल्याचे अलीकडेच निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI, पश्चिम क्षेत्र) आणि 'बृहन्मुंबई महानगरपालिका' (MCGM) यांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. मुंबई शहर आणि परिसरात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी 'FSSAI'ने सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना कडक निर्देश दिले आहेत. यापुढे अन्नपदार्थ बांधण्यासाठी, वाढण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रकारे अन्नाचा थेट संपर्क येईल अशा गोष्टींसाठी वर्तमानपत्रांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वर्तमानपत्रातील अन्न का आहे 'स्लो पॉयझन'?

FSSAI ने वर्तमानपत्राच्या वापरामागील गंभीर आरोग्य धोके स्पष्ट केले आहेत:

शाईतील जड धातू: वृत्तपत्राच्या छपाईसाठी वापरल्या जाणाऱ्या शाईमध्ये हानिकारक रंग, रंगद्रव्ये, बाइंडर्स आणि रसायने असतात. विशेषतः यात शिसे (Lead) आणि इतर जड धातू असतात, जे गरम अन्नपदार्थांमध्ये सहज उतरतात. यामुळे आरोग्याच्या गंभीर आणि दीर्घकालीन समस्या उद्भवू शकतात.

रोगजंतूंचा प्रसार: वृत्तपत्रांचे वितरण आणि हाताळणी अनेक हातांमधून आणि अस्वच्छ परिस्थितीतून होते. त्यामुळे ही वृत्तपत्रे अन्नजन्य आजार निर्माण करणाऱ्या धोकादायक रोगजंतूंचे (बॅक्टेरिया) वाहक बनतात.

'हा' नियम काय सांगतो?

Advertisement

अन्न सुरक्षा आणि मानके (पॅकेजिंग) नियम, २०१८ अनुसार, अन्न साठवण्यासाठी, ते गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्र अथवा अशा कोणत्याही साहित्याचा वापर करण्याला सक्त मनाई आहे.

रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, रेस्टॉरंट्स, क्लाउड किचन्स, केटरर्स, क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स (QSR), किरकोळ विक्रेते आणि फेरीवाले यांनी कोणत्याही खाद्यपदार्थावर प्रक्रिया करताना अथवा विक्रीदरम्यान वर्तमानपत्राचा वापर करू नये. यामध्ये भजी-वडापावचे अतिरिक्त तेल शोषून घेणे, अन्न झाकणे किंवा अन्न गुंडाळणे या सर्व गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे.

केवळ 'फूड-ग्रेड' साहित्याचाच वापर करा!

ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करून, FSSAI ने अन्नपदार्थांची विक्री आणि वितरण करताना केवळ सुरक्षित आणि मान्यताप्राप्त 'फूड-ग्रेड' (अन्न-सुरक्षित दर्जाच्या) पॅकेजिंग साहित्याचाच वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, ग्राहकांनीही या संदर्भात स्वतः सतर्क राहावे आणि वर्तमानपत्रात अन्न देणाऱ्या विक्रेत्यांना हटकून जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी FSSAI आणि राज्य सरकारची संबंधित प्राधिकरणे आता संयुक्तपणे मुंबईसह राज्यभरात विशेष मोहीम राबवत आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.