नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - नाशिकमधील 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस' (TCS) च्या बीपीओ (BPO) केंद्रात उघडकीस आलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या शोषण आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतरण प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक आणि मोठा खुलासा समोर आला आहे. पीडित तरुणीला 'ब्रेनवॉश' करण्यासाठी वादग्रस्त इस्लामी अभ्यासक झाकीर नाईक आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ दाखवण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या २,००० पेक्षा जास्त पानांच्या विस्तृत दोषारोपपत्रात (Charge Sheet) थेट झाकीर नाईकच्या नावाचा उल्लेख असून, पीडितेचा हादरवून टाकणारा जबाबही यात नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरातील आयटी आणि कॉर्पोरेट क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
'तू मंदिर जाना बंद कर...' : दोषारोपपत्रात पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पीडित तरुणीने तिच्यावर झालेल्या मानसिक आणि धार्मिक छळाची मोडस ऑपरेंडी सविस्तर मांडली आहे. मुख्य संशयित दानिश याने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर "तो आपल्याशी लग्न करेल की नाही? आणि आपले आई-वडील या लग्नाला तयार होतील का?" या भीतीने पीडितेचे मानसिक खच्चीकरण झाले होते.
याच भीतीचा गैरफायदा घेत दानिशने तिला सांगितले, "तू डर मत, मुझपे भरोसा रख, अपने साथ अल्लाह है! तू भगवान के गाने सुनती है, वह बंद कर और मंदिर जाना बंद कर, जो तेरा मेंटल स्ट्रेस है, वह कम हो जायेगा!" यासोबतच तिचे मानसिक दडपण कमी करण्याच्या बहाण्याने तिला तजबी वाचण्यास सांगण्यात आले आणि तारिक जमीलचे व्हिडिओ व बयाने ऐकवण्यास सुरुवात झाली.
तौसिफ आणि निदा खानकडून 'ब्रेनवॉशिंग'; हिंदू धर्माबद्दल संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न
या गुन्ह्यामध्ये केवळ दानिश एकटाच नसून, त्याला साथ देणारे तौसिफ आणि निदा खान हे देखील पीडितेचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करत होते. दोषारोपपत्रातील माहितीनुसार, दानिशने पीडितेची बँक खाती, यूपीआय पिन आणि खात्यातील शिल्लक रकमेची संपूर्ण माहिती हस्तगत केली होती. त्यानंतर तिचे धर्मांतरण करण्यासाठी तौसिफ आणि निदा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.
तौसिफने पीडितेच्या मोबाईलवर युट्युबच्या माध्यमातून झाकीर नाईक आणि डॉ. इसरार अहमद यांचे व्हिडिओ सर्च करून ते पाहण्यास सक्ती केली. तसेच, "आधी हिंदू धर्माची 'वेदाज बुक्स' (वेदांची पुस्तके) वाच आणि नंतर इस्लामचा अभ्यास कर, तुला नक्कीच इस्लाम धर्म आवडेल," असे सांगून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, इस्लाममधील शबा स्टोरी, इब्राहिम स्टोरी, बकरी ईदचे महत्त्व, जमजमचे पाणी, कुर्बाणीची कारणे आणि कयामतच्या दिवशी काय होईल, अशा गोष्टी सतत सांगून इस्लाम स्वीकारल्यास मानसिक ताण कायमचा दूर होईल, असा खोटा विश्वास पीडितेच्या मनात निर्माण करण्यात आला.
प्रेमाचे नाटक अन् आर्थिक लूट; महागाड्या वस्तूंसह घरचा किराणाही पीडितेच्या पैशातून!
धर्मांतरणाच्या दबावासोबतच मुख्य संशयित दानिश हा पीडित तरुणीची मोठी आर्थिक लूट देखील करत होता. कॅफेमध्ये खाण्या-पिण्याचे बिल भरण्यापासून ते त्याच्या घरचा किराणा भरण्यापर्यंत सर्व खर्च पीडितेच्या पैशातून केला जात होता.
लुटलेल्या वस्तूंची यादी:
मॉलमधील खरेदी: 'डीमार्ट'मधून संशयिताच्या घरासाठी लागणारा किराणा आणि 'झुडिओ'मधून कपड्यांची खरेदी.
गिफ्ट्सची सक्ती: महागाडी घड्याळे, इयर बड्स, व्हीआयपी (VIP) कंपनीच्या ट्रॅव्हल बॅग्ज आणि ब्रँडेड शूज.
ऑनलाईन आणि रोख रक्कम: सुरुवातीला विश्वासासाठी एक-दोन वेळा ऑनलाईन घेतलेली रक्कम परत केली. मात्र, त्यानंतर वेळोवेळी घेतलेली लाखो रुपयांची रोख आणि ऑनलाईन रक्कम आजतागायत परत केली नसल्याचे पीडितेने जबाबात म्हटले आहे.
काय आहे नाशिकचे हे बहुचर्चित धर्मांतरण प्रकरण?
नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीच्या कार्यालयात महिलांचे लैंगिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करून त्यांचे बळजबरीने धर्मांतरण केले जात असल्याचा प्रकार एका धाडसी पीडितेच्या तक्रारीनंतर उघडकीस आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत कंपनीच्या मॅनेजरपासून ते एचआर (HR) अधिकाऱ्यांपर्यंतच्या बड्या चेहऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटमध्ये पोलिसांनी आतापर्यंत ८ संशयितांवर ९ गंभीर गुन्हे दाखल केले असून, न्यायालयाने २,००० पानांपेक्षा जास्त भक्कम दोषारोपपत्र दाखल करत संशयितांची कोंडी केली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर नाशिकमध्ये धर्मांतरणाचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.