साडेतीन वर्षे दडवून ठेवलेले चोरीचे सोने विकायला निघाला अन् थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकला...

Share:
Main Image
Last updated: 05-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - चोरी केलेले सोने बाजारात विकण्यासाठी ग्राहक शोधत फिरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईमुळे तब्बल साडेतीन वर्षांपूर्वी सावरकर नगर भागात झालेल्या एका मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लागला आहे. पोलिसांनी संशयिताकडून साडेसहा लाख रुपये किमतीचे सुमारे ४१.७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. किशोर शालीक भालेराव (वय २२, रा. जोशीवाडा, बजरंगनगर, आनंदवली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.

पुलावरून पळताना पोलिसांनी केला पाठलाग!

गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंदसिंग परदेशी यांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण गुप्त माहिती मिळाली होती. एक चोरटा आनंदवली ते चांदसी रोडवरील पुलाजवळ चोरीचे सोने विकण्यासाठी येणार असल्याचे त्यांना समजले.

या माहितीच्या आधारे गुरुवारी (४ जून) गुन्हे शाखेच्या पथकाने या भागात सापळा रचला. आनंदवली-चांदसी मार्गावरील पुलावरून पायी जाणाऱ्या एका संशयित तरुणाला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पोलिसांना पाहून थेट पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पथकाने त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

अंगझडतीत सापडले लक्ष्मीचे कॉईन अन् मंगळसूत्र

पोलिसांनी संशयित किशोर भालेरावची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे नक्षीदार पेंडल असलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या आणि लक्ष्मीचे सोन्याचे कॉईन असा एकूण ४१.७७ ग्रॅम वजनाचा साडेसहा लाखांचा ऐवज मिळून आला.

पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा ऐवज चोरीचा असल्याची कबुली दिली. त्याने त्याचे साथीदार रोहित लोटे आणि विकास रामदास मैश उर्फ म्हशा यांच्या मदतीने तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी सावरकर नगर येथील एक बंगला फोडला होता. या घरफोडीत त्याच्या वाट्याला आलेले सोने तो विकण्याच्या तयारीत होता. या अटकेमुळे गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.

या पथकाने बजावली धडाकेबाज कामगिरी

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, मिलिंदसिंग परदेशी, संदीप भांड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रमेश कोळी, उत्तम पवार, धनंजय शिंदे, राजेश लोखंडे, अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे व अनुजा येलवे आदींच्या पथकाने केली.

Advertisement

Comments

No comments yet.