नाशिक, (प्रतिनिधी) ५ जून - घर उघडे असल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप पळवणाऱ्या एका सराईत भामट्याला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अंबड युनिट-३ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्याच्या अटकेमुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून, पोलिसांनी संशयिताकडून चोरीच्या लॅपटॉपसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पुष्कर उर्फ शुभम कैलास पाटील (वय २९, रा. नानाचा मळा, मुसडे इस्टेट, बालाजी गार्डन, कुबेर पेट्रोल पंपाजवळ, सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
अल्पावधीसाठी घराबाहेर पडणे नडले; लॅपटॉप गायब!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २६ मे रोजी कॅनडा कॉर्नर भागातील जान्हवी अपार्टमेंटमध्ये राहणारा नकुल शंकर भावसार (वय २२) हा विद्यार्थी दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त अल्पावधीसाठी घराबाहेर पडला होता. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्याची रूम उघडून आत असलेला लॅपटॉप चोरून नेला होता. या प्रकरणी नकुल भावसार याने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करत तपास सुरू केला होता.
'स्मार्ट' कॅमेरे अन् गुप्तहेरांचा अचूक सापळा
गुन्हे शाखा युनिट-३ चे अंमलदार योगेश चव्हाण व भगवान जाधव यांना सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत असताना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. पपया नर्सरी जवळील कृष्णनगर येथील संत जनार्दन रोड भागातील 'श्री कलावती हॉस्पिटल' परिसरात एक दुचाकीस्वार चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी (३ जून) दुपारच्या सुमारास या भागात सापळा रचला. संशयित पुष्कर उर्फ शुभम पाटील तेथे येताच पोलिसांनी झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
या पथकाने बजावली कामगिरी
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम आणि सविता कदम यांच्या पथकाने केली. या तपासात 'स्मार्ट सिटी' यंत्रणेचे कॅमेरे हाताळणारे भूषण खैरनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.