गोंदिया, (प्रतिनिधी) ५ जून - अनेक वर्षे हातात बंदूक घेऊन हिंसाचार, संघर्ष आणि अनिश्चिततेच्या वातावरणात जीवन व्यतीत केल्यानंतर, मुख्य प्रवाहात परतलेल्या दोन माजी माओवादी सदस्यांनी विवाह गाठ बांधून आयुष्याच्या एका नव्या आणि सुंदर पर्वाला सुरुवात केली आहे. पांडू पुसू वड्डे ऊर्फ गोलू आणि सैवंती रायसिंग पंधरे ऊर्फ संगीता अशी या नवविवाहित दांपत्याची नावे असून, गोंदिया पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात हा हृदयस्पर्शी विवाह सोहळा नुकताच पार पडला.
असा होता नक्षल चळवळीतील प्रवास
३७ वर्षीय पांडू (गोलू) हा मूळचा कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी असून तो सीपीआय (माओवादी) संघटनेत 'दर्रेकसा एरिया'मध्ये डिव्हिजनल कमिटी सदस्य म्हणून सक्रिय होता. तर ३६ वर्षीय सैवंती (संगीता) ही बालाघाट (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून ती त्याच एरिया कमिटीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. हिंसेचा मार्ग सोडून समाजात सन्मानाने जगण्याच्या आणि स्वतःचे कुटुंब उभे करण्याच्या इच्छेने या दोघांनी २८ नवंबर २०२५ रोजी गोंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले होते.
पोलिसांनी लावले लग्न, पुनर्वसनाची जबाबदारीही घेतली
पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रभारी पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. शासनाच्या पुनर्वसन धोरणांतर्गत या दोघांचे ओळखपत्र, निवडणूक ओळखपत्र आणि बँक खाते तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षणही दिले जात आहे.
या विवाह सोहळ्याला नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाते, राखीव पोलीस निरीक्षक राजेश सरोदे, सी-६० पथकाचे जवान आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून या जोडप्यावर अक्षता टाकून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
"हा विवाह केवळ एक सामाजिक कार्यक्रम नसून परिवर्तन, विश्वास आणि शांततामय भविष्याच्या आशेचा उत्सव आहे. जंगलात भरकटलेल्या इतर सदस्यांनाही हा सोहळा हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येण्यासाठी सकारात्मक संदेश देईल."
– पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया