नाशिक, (प्रतिनिधी) ४ जून - शहरातील उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याप्रकरणी एका संशयित नराधमाविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को - POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 'गोलू' उर्फ तुषार विजय गलोत (रा. संसरीनाका, देवळाली कॅम्प) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तमंदिर रोड भागात राहणाऱ्या पीडितेच्या नातेवाईक महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लॉजवर घेऊन गेल्याने प्रकार उघडकीस
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी तुषार गलोत हे एकमेकांच्या परिचयाचे होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. याचाच गैरफायदा घेत संशयिताने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.
दरम्यान, गेल्या मंगळवारी (२ जून) सायंकाळी संशयित आरोपीने पीडितेची दिशाभूल करून तिला मुक्तिधाम मंदिराच्या पाठीमागील 'नटराज हॉटेल' या लॉजवर नेले होते. मुलगी घरी परतल्यानंतर तिच्या वागण्यावरून संशय आल्याने कुटुंबीयांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी पीडितेने घडलेला सर्व प्रकार रडत रडत आपल्या कुटुंबीयांना सांगितला.
उपनगर पोलिसात गुन्हा दाखल, तपास सुरू
मुलीने आपबिती कथन करताच कुटुंबीयांनी तात्काळ उपनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी तुषार गलोतविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक कोरपड पुढील कायदेशीर तपास करत आहेत.