मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - महाराष्ट्रात ऑनलाइन ॲप आधारित ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सी सेवेबाबत (Cooperative Taxi Service) परिवहन विभागामार्फत तातडीने नियमावली तयार करून या सेवेस परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या ॲग्रीगेटर सहकारी टॅक्सीमुळे राज्यातील लाखो चालकांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'सहकार टॅक्सी को.ऑपरेटिव्ह लिमिटेड'ची (भारत टॅक्सी) सेवा सुरू करण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अदानी एअरपोर्टचे कार्यकारी संचालक जीत अदानी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चालक आता कामगार नाही, मालक होणार!
बैठकीत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, सध्या राज्यात खासगी कंपन्यांमार्फत ऑनलाइन टॅक्सी सेवा दिली जाते. मात्र, यामध्ये चालकांना सामाजिक सुरक्षा मिळत नाही आणि प्रवाशांनाही अनेक अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर, चालकांना कामगारांमधून थेट 'मालक' बनवणे आणि सहकाराच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. यासोबतच राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) देखील ‘छावा’ या नावाने स्वतःचे स्वतंत्र ॲप विकसित करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई, पुणे आणि नागपूरपासून सुरुवात
कर्नल हिमांशू यांनी सादरीकरणाद्वारे (Presentation) सांगितले की, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार 'भारत टॅक्सी' ही महत्त्वाकांक्षी संकल्पना देशातील सुमारे २ कोटी व्यावसायिक चालकांच्या सक्षमीकरणासाठी आणली गेली आहे. या सेवेची सुरुवात प्रथम मुंबईतून केली जाईल आणि त्यानंतर ती पुणे व नागपूर येथे विस्तारली जाईल. या टॅक्सी सेवेमुळे अगदी छोट्या शहरांपर्यंत पोहोचणे प्रवाशांना सहज शक्य होणार आहे.
'भारत टॅक्सी'चे चालकांसाठीचे मोठे फायदे:
विमा संरक्षण: चालकांना स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आरोग्य तसेच अपघात विमा संरक्षण मिळणार आहे.
कमी व्याजात कर्ज: 'प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने'अंतर्गत नवीन गाडी घेण्यासाठी अवघ्या ९.५ टक्के इतक्या कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
आयुष्मान भारत योजना: केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा' (PMJAY) थेट लाभ चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळेल.
न्याय्य उत्पन्न: चालकांना केवळ रोजगार न मिळता उत्पन्नाची न्याय्य संधी आणि थेट मालकी हक्क मिळणार आहे.
?s=20