मुंबई, (प्रतिनिधी) ४ जून - सह्याद्रीच्या दुर्गम गडकिल्ल्यांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिउंच पर्वतशिखरांपर्यंत आपल्या जिद्दीची पताका फडकावणाऱ्या ११ वर्षीय ग्रिहीथा विचारे हिचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात सत्कार करून गौरव केला. "चिमुकल्या वयात यशाची अनेक शिखरे पार करून ग्रिहीथा राज्यातील आणि देशातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरली आहे," अशा शब्दांत मंत्री तटकरे यांनी तिचे कौतुक केले.
तसेच ग्रिहीथाच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनामार्फत तिला *'बाल पुरस्कारा'*साठी सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी घोषणाही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केली.
गिर्यारोहणातून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा संदेश
ग्रिहीथा स्नेहा सचिन विचारे हिने वयाच्या अवघ्या ६ व्या वर्षी कुटुंबासोबत ट्रेकिंगला सुरुवात केली होती. आज ११ व्या वर्षात पदार्पण करेपर्यंत तिने महाराष्ट्रातील ११० हून अधिक गड-किल्ले आणि देशातील १८ राज्यांतील ऐतिहासिक दुर्ग सर केले आहेत. विशेष म्हणजे, विविध राज्यांतील गड-दुर्ग सर करताना तिने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा सामाजिक संदेश राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे, ज्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
चार आंतरराष्ट्रीय शिखरांवर तिरंगा फडकावला!
सह्याद्रीसोबतच ग्रिहीथाने जागतिक पातळीवरही भारताचे नाव उंचावले आहे. तिने आतापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय मोहिमा यशस्वीपणे फत्ते केल्या आहेत:
१. माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (तीव्र थंडी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत यश मिळवले)
२. माऊंट किलिमंजारो (दक्षिण आफ्रिका)
३. माऊंट किनाबालू (मलेशिया)
४. माऊंट बाझारडूझू (अझरबैजान)
सह्याद्रीतील कठीण मोहिमा फत्ते
महाराष्ट्रातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे कळसुबाई, भीमाशंकर, अलंग-मदन-कुलंग, गोरखगड, बोरंड्याची नाळ, आधाराई, काळू धबधबा, ढाक भैरी आणि जीवधन यांसारखे ट्रेक ग्रिहीथाने चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
"जगातील प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर सर करण्याचे माझे स्वप्न आहे," अशी इच्छा ग्रिहीथाने यावेळी बोलताना व्यक्त केली. तिच्या या धाडसाने महाराष्ट्रातील मुलींसमोर प्रेरणेचा एक नवा आदर्श उभा राहिला आहे.
?s=20