पंचवटीत तरुणाच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार... कारण ऐकून पोलिसही थक्क...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - मद्यपानासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन व्यक्तींनी एका हमालावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना पेठफाटा भागात घडली. या घटनेत ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दत्तात्रेय चव्हाण (वय ३०, रा. क्रांतीनगर, मखमलाबाद रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

Advertisement

नेमकी घटना काय?
आकाश चव्हाण हा मार्केट यार्डात हमालीचे काम करतो. सोमवारी (दि. १) दुपारी काम आटोपून तो पायी घराकडे जात असताना ही घटना घडली. पेठरोड सिग्नलवरील सानप चिवडा दुकानासमोरून जात असताना, त्याला सोनू आणि दादू नामक दोन ओळखीच्या संशयितांनी गाठले. या दोघांनी आकाशकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. आकाशने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.

धारदार शस्त्राने डोक्यात वार
पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित सोनू आणि दादू संतप्त झाले. त्यांनी आकाशला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, संशयित सोनूने कमरेला लावलेल्या एका धारदार शस्त्राने आकाशच्या डोक्यात जोरदार वार केला. यात आकाश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर संशयित फरार झाले असून, जखमी आकाशवर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार कुलकर्णी अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.