नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - प्रेमप्रकरणातून एका अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी आणि तिला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित युवक मुलीशी संपर्क साधण्याचा आग्रह धरून तिच्या कुटुंबियांनाही दमदाटी करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रथमेश भानुदास धुरंधरे (वय २३, रा. बजरंगवाडी) असे संशयिताचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
पिडीत मुलगी आणि संशयित प्रथमेश हे एकाच भागात राहत असून, सन २०२४ पासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सुरू झालेली ही ओळख पुढे छळाच्या प्रकारात रूपांतरित झाली. संशयिताने वेळोवेळी पिडीतेचा शारीरिक संबंधांसाठी पाठलाग केला आणि तिला मारहाणही केली. हा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू होता. ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी पिडीतेस संशयिताशी संपर्क साधण्यास सक्त मनाई केली होती.
आई-बहिणीला शिवीगाळ व दमदाटी
कुटुंबियांच्या विरोधानंतर संतप्त झालेल्या प्रथमेशने शनिवारी (दि. ३०) मुलीच्या आई आणि बहिणीशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी त्याने पिडीतेशी बोलण्याचा आग्रह धरला. आई आणि बहिणीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर पिडीतेच्या आईने मुंबईनाका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत.