रिक्षा उलटून भीषण अपघात... ३७ वर्षीय तरुण ठार...

Share:
Last updated: 02-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - देवळाली कॅम्प येथील मिलिटरी गेटसमोरील रेल्वे फाटक भागात एक भरधाव ऑटोरिक्षा उलटून झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरेश उत्तमराव कचवे (वय ३७, रा. बॉर्न्स स्कूलजवळ, भगूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश कचवे हे सोमवारी (दि. १ जून) ऑटोरिक्षाने प्रवास करत होते. मिलिटरी गेटसमोरील रेल्वे फाटक परिसरातून जात असताना, चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव रिक्षा अचानक उलटली. या अपघातात कचवे यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Advertisement

मित्राची धावपळ, पण उपचार अपयशी
अपघाताची माहिती मिळताच त्यांचे मित्र साहिल शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी नरेश यांना तातडीने प्रथमोपचारासाठी स्थानिक कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना, मंगळवारी पहाटे वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे भगूर परिसरासह बॉर्न्स स्कूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे हवालदार गिऱ्हे करत आहेत.

Comments

No comments yet.