नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - नाशिकच्या क्रीडा आणि फिटनेस क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिकचे ख्यातनाम खेळाडू अलीअसगर आदमजी आणि शीतल संघवी यांची स्वीडन येथे होणाऱ्या आगामी 'हायरॉक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६' (HYROX World Championships) या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेतील 'मिक्स डबल्स' (Mixed Doubles) प्रकारात पात्र ठरणारी ही संपूर्ण भारतातील एकमेव जोडी ठरली आहे. ही जागतिक स्पर्धा १८ ते २१ जून २०२६ दरम्यान स्टॉकहोम (स्वीडन) येथे रंगणार आहे.
स्पर्धांमध्ये निर्भेळ यश आणि 'हॅट्ट्रिक'
अलीअसगर आणि शीतल यांनी राष्ट्रीय स्तरावरील 'हायरॉक्स' स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीचा दबदबा निर्माण केला आहे. त्यांनी भारतात आयोजित करण्यात आलेल्या मुंबई २०२५, दिल्ली २०२५ आणि पुन्हा मुंबई २०२५ अशा सलग तिन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत यशाची 'हॅट्ट्रिक' केली. याच सातत्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवले आहे.
'नाशिक ब्रँड' आंतरराष्ट्रीय स्तरावर!
या जागतिक महामुकाबल्यासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून दोन्ही खेळाडू नाशिकमधील 'व्ही फिटनेस' (V Fitness) आणि 'आयर्नस्पोर्ट्स जिम' (Ironsports Gym) येथे कठोर मेहनत आणि सराव करत आहेत. त्यांच्या या यशामुळे फिटनेस आणि रनिंग क्षेत्रात नाशिकचे नाव थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.
'स्ट्रायकिंग स्ट्राईडर्स नाशिक'कडून कौतुकाचा वर्षाव
अलीअसगर आणि शीतल यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल 'स्ट्रायकिंग स्ट्राईडर्स नाशिक' (Striking Striders Nashik) तर्फे दोन्ही खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला आणि आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
"अलीसगर आदमजी आणि शीतल संघवी यांचे हे यश प्रत्येक नाशिककरासाठी आणि देशवासियांसाठी अभिमानास्पद आहे. ते जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत असून, ते स्वीडनमध्येही देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवतील, असा आम्हाला विश्वास आहे," अशी भावना 'स्ट्रायकिंग स्ट्राईडर्स'च्या वतीने व्यक्त करण्यात आली.
या दोन्ही खेळाडूंचे हे यश नाशिकमधील आणि राज्यातील इतर युवा खेळाडूंना फिटनेस क्षेत्रात करिअर करण्यासाठी मोठी प्रेरणा देणारे ठरणार आहे.