राज्य मंत्रिमंडळाचा मास्टरस्ट्रोक... या निर्णयांना धडाकेबाज मंजुरी...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २ जून - राज्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३' आणि 'राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पा'साठी आंतरराष्ट्रीय बँकांकडून हजारो कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, मुंबईतील थडोमल शाहनी अभियांत्रिकीसह पाच नामांकित महाविद्यालयांचा आता एकाच समूह विद्यापीठात (क्लस्टर युनिव्हर्सिटी) समावेश करण्याचा मोठा निर्णय शिक्षण क्षेत्रात घेण्यात आला आहे.

रस्ते विकासाला गती; आंतरराष्ट्रीय बँकांकडून अर्थसाहाय्य
राज्यातील ग्रामीण आणि मुख्य रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाने दोन मोठे आर्थिक प्रस्ताव मंजूर केले आहेत:
ग्रामीण रस्ते (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३): या योजनेतंर्गत होणाऱ्या विविध कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून (AIIB) ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे (अंदाजे ४ हजार कोटींहून अधिक) कर्ज घेण्यास आणि राज्य शासनाच्या निधीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे.
राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प (मेगा रस्ते विकास): महाराष्ट्रातील प्रमुख रस्ते सुधारण्यासाठी 'आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक' (AIIB) आणि 'न्यू डेव्हलपमेंट बँक' (NDB) या दोन्ही आंतरराष्ट्रीय बँकांकडून प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील दळणवळण अधिक वेगवान होणार आहे.

मुंबईतील ५ नामांकित कॉलेजांचा 'समूह विद्यापीठात' समावेश
उच्च शिक्षण क्षेत्रात मुंबईसाठी आजचा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. 'हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई' (HSNC University) या समूह विद्यापीठामध्ये आता मुंबईतील आणखी पाच नामांकित महाविद्यालयांचा 'घटक महाविद्यालये' म्हणून समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Advertisement

या कॉलेजांचा झाला समावेश:
१. प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (फार्मसी कॉलेज), मुंबई.
२. किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय (केसी लॉ कॉलेज), मुंबई.
३. श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय (एमएमके कॉलेज), मुंबई.
४. ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय (नॅशनल कॉलेज), मुंबई.
५. थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय (टीएसईसी - इंजिनिअरिंग कॉलेज), मुंबई.

निर्णयाचा फायदा काय?
या नामांकित महाविद्यालयांचा समूह विद्यापीठात समावेश झाल्यामुळे त्यांना स्वायत्तता मिळून नवीन अभ्यासक्रम सुरू करणे, शैक्षणिक दर्जा उंचावणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करणे अधिक सोपे होणार आहे.

?s=20

Comments

No comments yet.