व्हीलचेअरवर आले, स्वतःच्या पायावर चालत गेले... विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हॉलमध्ये संपन्न झाला भावुक सोहळा...

Share:
Main Image
Last updated: 02-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २ जून - उत्तर भारतीय प्रवर्तक, राष्ट्रसंत पूज्य श्री आशीषमुनिजी म.सा. यांच्या प्रेरणेने नवकार आशीष सेवा ट्रस्टतर्फे दिव्यांग बांधवांसाठी एक अत्यंत कौतुकास्पद आणि मानवतावादी उपक्रम राबविण्यात आला. 'मोफत कृत्रिम अवयव सहाय्यता व पुनर्वसन सेवा' उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या १२५ गरजू दिव्यांग बंधू-भगिनींना रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी विविध कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले.
पुणे येथील 'साधू वासवानी मिशन' यांच्या विशेष सहकार्याने म्हसरूळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हॉलमध्ये हा सोहळा संपन्न झाला.

मोजमाप करून तयार केले आधुनिक अवयव
या सेवा उपक्रमाची सुरुवात ३ मे रोजी झाली होती, जेव्हा नाशिकमध्ये आलेल्या शेकडो दिव्यांग बांधवांच्या कृत्रिम अवयवांसाठीचे आवश्यक मोजमाप (मेझरमेंट) अत्यंत आधुनिक पद्धतीने घेण्यात आले होते. त्यानुसार विशेष तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आलेले कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, व्हीलचेअर्स, कुबड्या व अन्य अत्याधुनिक साधनांचे वितरण ३१ मे रोजी करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जाती-धर्मांतील दिव्यांग बांधवांनी नोंदणी केली होती आणि सर्वांना याचा लाभ देण्यात आला.

कार्यक्रमस्थळी डोळ्यांत तरळले आनंदाश्रू!
या संपूर्ण सोहळ्यातील सर्वात हृदयस्पर्शी आणि भावुक क्षण तो ठरला, जेव्हा अनेक लाभार्थी हे नातेवाईकांच्या मदतीने, व्हीलचेअरवर किंवा कुबड्यांच्या आधाराने अत्यंत कष्टाने कार्यक्रमस्थळी आले होते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले आणि अवघ्या काही वेळातच ते लाभार्थी कुबड्या फेकून स्वतःच्या पायावर ताठ उभे राहिले व चालत घरच्या दिशेने रवाना झाले. हा विहंगम आणि भावनिक बदल पाहून स्वतः लाभार्थी, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

Advertisement

जैन समाजातील विविध संघटनांचे सहकार्य आणि मान्यवरांची उपस्थिती
हा भव्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवकार ग्रुप, भारतीय जैन संघटना, मारवाडी युवा मंच, जैन युवक मंडळ, मारवाडी महिला मंडळ, इनरव्हील क्लब ऑफ जैन नेक्स्ट, तसेच श्री जैन स्थानकवासी संघ (म्हसरूळ) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

'महाराष्ट्र गौरव', 'खान्देश केसरी' परम पूज्य श्री गौतममुनिजी म.सा. बरसादाता आदि ठाणा - २ व जिनशासन प्रभाविका पूज्य साध्वी श्री विभक्ति श्री जी म.सा. आदि ठाणा - ३ यांच्या पावन आणि मंगल सान्निध्यात हा सोहळा पार पडला.

याप्रसंगी नाशिकच्या माजी महापौर रंजना भानसी, नगरसेविका दिपाली गीते, समाजसेवक सोमनाथ वडजे यांच्यासह जैन समाजातील विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश भंडारी, विनोद कांकरिया, प्रा. सीए लोकेश पारख, संदीप गांग, रवी लुणावत, श्रद्धा लुणावत, रवीन्द्र बोरा, निलेश पगारिया, अतुल अचलिया आदींसह नवकार आशीष सेवा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

No comments yet.