नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - किरकोळ विक्री केंद्रांवरून (पेट्रोल पंप) व्यावसायिक, औद्योगिक अथवा संस्थात्मक ग्राहकांना अनधिकृतपणे इंधन पुरवठा करणे किंवा इंधन वळविणे हा गंभीर नियमभंग आहे. जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, डीलर्स तसेच व्यावसायिक व औद्योगिक संस्थांनी इंधन खरेदी-विक्री संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. असे गैरप्रकार आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना थेट रद्द करण्यात येईल आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे आणि अतिरिक्त धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड उपस्थित होते.
किरकोळ आणि घाऊक ग्राहक श्रेणीत मोठा भेद
पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, किरकोळ ग्राहक आणि संस्थात्मक (घाऊक) ग्राहक या दोन पूर्णपणे स्वतंत्र श्रेणी असून त्यांच्या इंधन खरेदीसाठी वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी लागू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 'इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरूद्ध केरला स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन (२०१८)' या खटल्यातील निकालातही या दोन्ही ग्राहक वर्गांमधील कायदेशीर भेद स्पष्ट केला आहे. त्यामुळे किरकोळ डिझेल-पेट्रोल पंपांवरून मोठ्या व्यावसायिक किंवा औद्योगिक संस्थांना बल्क (घाऊक) मध्ये इंधन पुरवठा करणे कायद्यानुसार अवैध ठरते.
'या' कायद्यांतर्गत होणार कठोर कारवाई:
केंद्र शासनाचा 'द मोटार स्पिरिट हाय स्पीड डिझेल रेग्युलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रिब्युशन अँड प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिसेस ऑर्डर २००५' या आदेशानुसार कठोर कारवाई केली जाईल.
अनधिकृत इंधन वळवण किंवा साठवणूक केल्याचे आढळल्यास 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५' (Essential Commodities Act) आणि इतर लागू कायद्यांनुसार थेट फौजदारी गुन्हे दाखल होतील.
दोषी आढळणाऱ्या डीलर्सचा पेट्रोल पंप परवाना तत्काळ निलंबित किंवा कायमचा रद्द केला जाईल.
जिल्ह्यात राबवणार 'सरप्राईज' चेकिंग मोहीम
पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीतील अनधिकृत व्यवहार आणि काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी (प्रांत), तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंप तसेच इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर्स व वाहनांची 'आकस्मिक तपासणी' (Surprise Inspection) केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी इंधन वितरण व्यवस्थेची पारदर्शकता आणि शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि कोणत्याही अनधिकृत पुरवठ्यापासून दूर राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.