नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - शहरातील अत्यंत गजबजलेल्या बिटको चौकात चोरट्यांनी एक अवाक करणारी धाडसी चोरी केली आहे. भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) कंपनीच्या वतीने अंडरग्राउंड टाकण्यात आलेली तब्बल ३५ लाख रुपये किमतीची युजी केबल (UG Cable) चोरट्यांनी सिमेंटचे चेंबर उघडून ओढून नेली. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरातील टेलिकॉम यंत्रणेसह पोलीस प्रशासनातही मोठी खळबळ उडाली असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कंपनीचे काम पाहणारे बाळासाहेब दत्तात्रेय कोटकर (रा. कलानगर, जेलरोड, नाशिकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरचौकात 'अशी' झाली लाखोंची चोरी
BSNL च्या वतीने शहरात दूरसंचार सेवा सुरळीत चालण्यासाठी जमिनीखालून 'अंडरग्राउंड केबल'चे जाळे टाकण्यात आले आहे. शनिवारी (दि. ३० मे) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बिटको चौकातील संजय मेडिकलसमोर असलेल्या भूमिगत वाहिनीच्या सिमेंटचे चेंबर अत्यंत चालाखीने उघडले.
या चेंबरमधून गेलेली ३५ लाख रुपये किमतीची, १२०० पिअरची आणि तब्बल ५०० मीटर लांबीची जेलीफीड अंडरग्राउंड केबल चोरट्यांनी कोणत्या तरी वाहनाच्या किंवा अवजड साहित्याच्या सहाय्याने ओढून बाहेर काढली आणि लंपास केली.
सीसीटीव्ही आणि टोळ्यांचा शोध सुरू
भरचौकात इतक्या मोठ्या प्रमाणावर केबल ओढून नेण्यासाठी चोरट्यांनी मोठी यंत्रणा किंवा वाहनाचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. या धाडसी चोरीमुळे नाशिकरोड परिसरातील BSNL च्या सेवेवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, केबल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळ्यांवर पोलिसांची नजर आहे.