नाशिकमध्ये चोरटे बेफाम... तपोवनात भागवत कथेच्या समाप्तीला ४ लाखांचे दागिने लंपास...

Share:
Last updated: 01-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - नाशिक शहरात सणासुदीचे आणि धार्मिक कार्यक्रमांचे दिवस सुरू असतानाच चोरटे आणि चैनस्नॅचर्सनी (मंगळसूत्र चोर) अक्षरशः उच्छाद मांडला आहे. तपोवनात आयोजित श्रीमद् भागवत कथा सोहळ्याच्या समाप्ती प्रसंगी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन महिलांचे सुमारे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. तर दुसरीकडे, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी ओरबाडून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणांमुळे नाशिककरांमध्ये, विशेषतः महिला वर्गात तीव्र भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

भागवत कथेच्या गर्दीत 'हात की सफाई'; तीन महिलांचे दागिने चोरीला
तपोवनातील चव्हाणनगर भागात असलेल्या 'साई श्रद्धा लॉन्स' येथे श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि. ३१ मे) या भागवत कथेचा समाप्ती सोहळा असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत चोरट्यांच्या टोळीने महिलांना टार्गेट केले.
पहिली चोरी: नाशिकरोड येथील संगीता जयनारायण घुले (रा. प्राईड मोनार्क अपार्टमेन्ट, जयबाई कॉलनी रोड) या पतीसोबत कथेसाठी आल्या होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हातोहात लांबवले.
दुसरी व तिसरी चोरी: याच सोहळ्यात उपस्थित असलेल्या अवंती सोमनाथ बाळमोरे यांच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपयांचे आणि लक्ष्मी जगन्नाथ देशमुख यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने भामट्यांनी गर्दीत ओरबाडले.
एकाच कार्यक्रमात तीन महिलांना लुटल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार राजूळे पुढील तपास करत आहेत.

शहरात चैनस्नॅचर्सचा धुमाकूळ; पायी आणि दुचाकीस्वार महिलांना गाठले
शनिवारी (दि. ३० मे) शहरात दोन वेगवेगळ्या भागात चैनस्नॅचिंगच्या धाडसी घटना घडल्या. यामध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे अलंकार हिसकावून नेले.
रामवाडी रोड (पंचवटी): हिरावाडी भागात राहणाऱ्या संगीता रामनाथ झनकर (रा. गुंजाळबाबानगर) या पेशाने केअरटेकर (रुग्णाची काळजी घेणाऱ्या) आहेत. शनिवारी रात्री आपले काम संपवून त्या रामवाडी रोडवरील कोशिरे मळा भागातील पेरूच्या बागेजवळून पायी घराकडे जात होत्या. या अंधाराचा फायदा घेत पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
काठेगल्ली (भद्रकाली): दुसरा प्रकार बनकर चौकात घडला. मूळच्या पुण्याच्या असलेल्या विद्या मनोज नाशिककर (रा. माणिकबाग, सिंहगड, पुणे) या नाशिकमध्ये आल्या होत्या. शनिवारी रात्री त्या दुचाकीवरून काठेगल्लीतील बनकर चौकातील महावीर ज्वेलर्स परिसरातील इडली पीठ विक्री दुकानासमोरून जात असताना, पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडले आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक सय्यद तपास करत आहेत.
पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आव्हान
शहरात एकाच आठवड्यात चोरी आणि जबरी चोरीच्या अनेक घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गर्दीच्या ठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या दोन्ही टोळ्यांचा माग काढत आहेत.

Comments

No comments yet.