नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - शहरातील हायवे आणि सर्व्हिस रोड रात्रीच्या वेळी किती असुरक्षित बनले आहेत, याचा प्रत्यय आणून देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मुंबईनाका भागात घडली आहे. महामार्गावरून आपल्या दुचाकीने घराकडे जाणाऱ्या एका २५ वर्षीय व्यावसायिकाला चार जणांच्या टोळक्याने रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील ४५ हजारांच्या रोकडसह सोन्याची साखळी असा सुमारे १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. विशेष म्हणजे, पीडित युवकाच्या मदतीसाठी धावून आलेल्या वाटसरूंनाही या गुंडांनी बेदम चोप दिला.
या खळबळजनक प्रकारामुळे मुंबईनाका आणि द्वारका परिसरात रात्रीच्या पोलीस गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून मुंबईनाका पोलीस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ललित राजेंद्र कोल्हे (वय २५, रा. आव्हाड चौक, चेतनानगर, नाशिक) या तरुणाने फिर्याद दिली आहे. ललित हा वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो.
तोंड बांधून आलेल्या टोळक्याने घातला वेढा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित कोल्हे शनिवारी (दि. ३० मे) काही कामानिमित्त द्वारका भागात गेला होता. मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 15 DX 4436) सर्व्हिस रोडने चेतनानगर येथील घराकडे परतत होता. मुंबईनाका परिसरातील 'साईप्रितम हॉटेल'जवळ तो आला असता, अचानक तोंड बांधून आलेल्या चार अज्ञात गुंडांच्या टोळक्याने त्याची मोटारसायकल अडवली.
बेदम मारहाण करत चाकूचा धाक
काही समजण्याच्या आतच या टोळक्याने ललितला कोणतीही कुरापत नसताना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ललितच्या कमरेला गंभीर दुखापत झाली. इतक्यावरच न थांबता एकाने धारदार चाकू काढून ललितच्या छातीवर लावला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. चोरट्यांनी त्याच्या खिशातील ४५ हजार रुपयांची रोकड आणि गळ्यातील सोन्याची साखळी असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने ओरबाडून घेतला.
मदतीला धावणाऱ्यांनाही बेदम चोप!
ललितचा ओरडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून जाणाऱ्या काही सुजाण वाटसरूंनी आणि नागरिकांनी त्याच्या बचावासाठी धाव घेतली. मात्र, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या टोळक्याने मदतीला आलेल्या त्या वाटसरूंनाही लाथाबुक्क्यांनी आणि हातातील हत्यारांनी बेदम चोप दिला. नागरिकांवर हल्ला केल्यानंतर हे टोळके अंधाराचा फायदा घेऊन हायवेने पसार झाले.
या घटनेनंतर जखमी ललितने पोलीस ठाण्यात धाव घेतली. सध्या मुंबईनाका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. हॉटेल परिसर आणि महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या रात्रीच्या लुटेऱ्यांचा शोध घेतला जात आहे.