मुंबई, (वृत्तसंस्था) १ जून - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये अधिक प्रभावी आणि सुटसुटीत अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या शैक्षणिक, प्रशासकीय व तांत्रिक अडचणींवर मात करून संपूर्ण राज्यात एकसमान मार्गदर्शन मिळावे, यासाठी एका विशेष *'राज्यस्तरीय टास्क फोर्स'*चे गठन करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
टास्क फोर्स नेमकी काय करणार?
राज्यात सध्या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ॲकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC), मेजर-मायनर पद्धती, इंटरर्नशिप आणि इंडियन नॉलेज सिस्टिम (IKS) लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हा टास्क फोर्स खालील महत्त्वाच्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन आणि नियमावली तयार करेल:
चौथ्या वर्षाची रचना: चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमातील शेवटच्या (चौथ्या) वर्षाचे नियोजन आणि आराखडा कसा असावा, याबाबत दिशा ठरवणे.
मल्टीपल एंट्री-एक्झिट व क्रेडिट ट्रान्सफर: विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची किंवा पुन्हा सुरू करण्याची मुभा (Entry-Exit) देणे आणि त्यांचे क्रेडिट्स ट्रान्सफर करणे सोपे करणे.
एकसमान शैक्षणिक कॅलेंडर: राज्यातील सर्व विद्यापीठांचे परीक्षा व सुट्ट्यांचे वेळापत्रक (Uniform Academic Calendar) एकसमान ठेवणे.
विद्यार्थी मदत कक्ष व शिक्षक प्रशिक्षण: विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष मदत कक्ष (Help Desk) सुरू करणे आणि शिक्षकांसाठी आवश्यक प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
तीन महिन्यांनी सादर होणार प्रगती अहवाल
या टास्क फोर्समध्ये विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती राज्यातील सर्व विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांमधील 'एनईपी' अंमलबजावणीचा नियमित आढावा घेईल आणि दर तीन महिन्यांनी आपला प्रगती अहवाल (Progress Report) शासनास सादर करेल.
"महाराष्ट्रातील उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि पूर्णपणे विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत मैलाचा दगड ठरेल," असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.