नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे (NDCA) मखमालबाद येथील क्रीडक सेंटर ऑफ क्रिकेट एक्सलन्स येथे नाशिकमधील पहिल्या व्यावसायिक जलदगती गोलंदाज गुणवत्ता शोध मोहिमेचे (NASHIK’S 1st SPEEDSTAR – FASTEST BOWLER HUNT) आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेला नाशिकमधील उदयोन्मुख तसेच प्रस्थापित जलदगती गोलंदाजांचा उदंड प्रतिसाद लाभला. नाशिकच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अत्याधुनिक रडार स्पीड गन (Radar Speed Gun) च्या सहाय्याने गोलंदाजांच्या वेगाची अचूक चाचणी घेण्यात आली.
या मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे माजी रणजीपटू, प्रसिद्ध जलदगती गोलंदाज, राज्याचे विद्यमान गोलंदाजी प्रशिक्षक व महाराष्ट्र पेस फाउंडेशनचे एलिट सदस्य अनुपम संकलेचा प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी सुरुवातीलाच सर्व गोलंदाजांना आधुनिक क्रिकेटमधील वेग आणि अचूकतेचे महत्त्व सांगत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, खजिनदार हेमंत देशपांडे, क्रीडक सेंटरचे विनोद यादव, प्रशिक्षक के. व्ही. जोशी, तरुण गुप्ता, फैय्याज गंजीफ्रॉकवाला आदी मान्यवर उपस्थित होते.
विजेत्यांवर बक्षिसांची खैरात
चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रमुख अतिथी अनुपम संकलेचा यांच्या हस्ते खुल्या वर्गातील विजेत्यास ५,००० रुपये तर उपविजेत्यास ३,००० रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच १६ वर्षांखालील गटातील विजेत्यास ३,००० रुपये आणि उपविजेत्यास २,००० रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
'स्पीडस्टार' मोहिमेचे अंतिम निकाल आणि विजेते:
गट खेळाडूचे नाव गोलंदाजीचा वेग (किमी/तास) पटकावलेले स्थान
मुली - १६ वर्षांखालील आरोही सानप ७७ किमी विजेती
मुली – खुला वर्ग धनश्री काकड १०५ किमी विजेती
मुली - खुला वर्ग वैष्णवी फटांगरे १०० किमी उपविजेती
मुले - १६ वर्षांखालील विहान हेकरे ११७ किमी विजेता
मुले - १६ वर्षांखालील शिवम केवट ११३ किमी उपविजेता
मुले - खुला वर्ग रोहन शेडगे १२९ किमी विजेता
मुले - खुला वर्ग आकाश शेलार १२६ किमी उपविजेता
नाशिकच्या क्रिकेटसाठी ऐतिहासिक पाऊल
"नाशिकमध्ये टॅलेंटची कमी नाही, गरज आहे ती आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची. रडार स्पीड गनमुळे गोलंदाजांना त्यांच्या अचूक वेगाची माहिती मिळाली आहे. यातून निवडलेल्या खेळाडूंना पुढील उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल."
— समीर रकटे, सेक्रेटरी, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.