विधान परिषद निवडणूक... भाजपचे हे ११ उमेदवार जाहीर... संभाजीनगर, जळगावच्या 'सस्पेन्स'वर पडदा...

Share:
Main Image
Last updated: 01-Jun-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १ जून - महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत मोठी आणि उत्कंठावर्धक बातमी समोर आली आहे. आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना भाजपने ही नाट्यमय घोषणा केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या निवडणुकीत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये अनेक जागांवरून जोरदार चुरस पाहायला मिळत होती. मात्र, एकूण १६ जागांपैकी तब्बल ११ जागांवर आपले उमेदवार जाहीर करत भाजपने महायुतीत आपणच 'मोठा भाऊ' असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. संख्याबळ जास्त असल्यामुळे भाजपने या जागांवर आपला दावा लावून धरला होता, त्यात त्यांना यश आले आहे.

दिल्लीतील २ तासांच्या बैठकीनंतर शिक्कामोर्तब
भाजप उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची जवळपास दोन तास महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक संपवून देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर काही वेळातच पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

संभाजीनगर आणि जळगावच्या 'सस्पेन्स'वर पडदा
छत्रपती संभाजीनगर-जालना : गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महायुतीमधील शिवसेना आणि भाजप यांच्यात तीव्र रस्सीखेच सुरू होती. येथे शिवसेनेचा आमदार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा या जागेवर थेट दावा होता. मात्र, भाजपने संख्याबळाचे कारण देत ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. या जागेवरून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे.
जळगाव : जळगावच्या जागेसाठी स्थानिक शिवसेनेचे आमदार प्रचंड आग्रही होते. त्यासाठी आमदारांची गुप्त बैठक होऊन 'मैत्रीपूर्ण लढती'चा इशाराही देण्यात आला होता. मात्र, भाजपने या जागेवरही आपला झेंडा फडकवत नंदकिशोर महाजन यांना मैदानात उतरवले आहे.

Advertisement

'अहिल्यानगर'मध्ये प्राजक्त तनपुरेंना लॉटरी, 'गोंदिया'त ब्राम्हणकरांना संधी
नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना अहिल्यानगरमधून उमेदवारी देऊन भाजपने सर्वांनाच धक्का दिला आहे. तर दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अवघ्या २५० मतांच्या फरकाने अत्यंत चुरशीची लढत देणारे अविनाश ब्राम्हणकर यांना पक्षाने भंडारा-गोंदियातून विधान परिषदेची मोठी संधी दिली आहे.

भाजपच्या ११ उमेदवारांची संपूर्ण यादी:
मतदारसंघ उमेदवार
छत्रपती संभाजीनगर-जालना सुहास शिरसाट
जळगाव नंदकिशोर महाजन
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली अरुण लखानी
अमरावती प्रवीण पोटे (अर्ज दाखल, आज अधिकृत घोषणा)
भंडारा-गोंदिया अविनाश ब्राम्हणकर
सोलापूर राजेंद्र राऊत
सांगली-सातारा धैर्यशील कदम
अहिल्यानगर (अहमदनगर) प्राजक्त तनपुरे
नांदेड अमर राजूरकर
धाराशिव-लातूर बसवराज पाटील
नागपूर (पोटनिवडणूक) राजीव पोतदार

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस!
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज १ जून रोजी शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार असल्याने, भाजपचे उर्वरित उमेदवार आणि महायुतीचे इतर घटकपक्ष सकाळपासूनच अर्ज भरण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

?s=20

Comments

No comments yet.