नाशिक, (प्रतिनिधी) १ जून - राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीने अखेर आपला सस्पेन्स संपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार विद्यमान आमदार नरेंद्रजी दराडे यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज, सोमवार दिनांक १ जून २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दराडे आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करणार आहेत. मात्र, महायुतीने दराडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली असली, तरी भाजपच्या गोटातून झालेल्या एका मोठ्या घडामोडीमुळे या निवडणुकीत नवा 'ट्विस्ट' निर्माण झाला असून, संपूर्ण राज्याचे लक्ष आता नाशिककडे लागले आहे.
जागा शिवसेनेची, पण भाजपचाही होता तगडा दावा
नाशिकची ही जागा मूळची एकसंघ शिवसेनेकडे होती आणि विद्यमान आमदार नरेंद्र दराडे हे शिवसेना विभागणीनंतर शिंदे गटात सामील झाले होते. त्यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा शब्द पक्षश्रेष्ठींनी दिला होता. मात्र, स्थानिक पातळीवर संख्याबळ अधिक असल्याचा दावा करत भारतीय जनता पक्षाने (भाजप) या जागेवर आपला जोरदार हक्क सांगितला होता. भाजपमधून प्रामुख्याने माजी नगरसेवक निलेश बोरा आणि मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गिते यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती.
गणेश गितेंचा अर्ज दाखल; उमेदवारी मागे घेणार का?
महायुतीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वीच, शनिवारी (३० मे) भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करत महायुतीत मोठी खळबळ उडवून दिली. गितेंच्या या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत 'एबी फॉर्म' नसला, तरी भाजपच्या ९ माजी नगरसेवकांनी सूचक म्हणून स्वाक्षऱ्या करत त्यांना थेट पाठिंबा दर्शवला आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्याला शब्द दिला होता, असा दावा गितेंनी केला आहे.
आता महायुतीने अधिकृतपणे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नरेंद्र दराडे यांचे नाव जाहीर केल्यामुळे, "गणेश गिते आपला अर्ज मागे घेणार की नाशिकमध्ये 'मैत्रीपूर्ण लढत' पाहायला मिळणार?" याकडे राजकीय विश्लेषकांचे डोळे लागले आहेत. निलेश बोरा यांनी सध्या 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असली, तरी गितेंच्या भूमिकेवर महायुतीची पुढची रणनीती अवलंबून असणार आहे.
आज महायुतीचे मोठे शक्तीप्रदर्शन
महायुतीच्या वतीने नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आज सकाळी १०:३० वाजेपर्यंत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नरेंद्र दराडे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने महायुती नाशिकमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करत आहे. मात्र, या शक्तीप्रदर्शनात भाजपचे स्थानिक नेते आणि स्वतः गणेश गिते उपस्थित राहतात का, यावर नाशिकच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.
पक्षाच्या आदेशाचे पालन होणार का?
महायुतीच्या अधिकृत घोषणेनंतर आता भाजपचे वरिष्ठ नेते गणेश गिते यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरतात का आणि बंडखोरी टाळली जाते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत नाशिकमधील ही राजकीय रस्सीखेच अधिक रंजक होण्याची चिन्हे आहेत.