'कॉक्रोच जनता पार्टी'ला दिल्ली हायकोर्टाचा झटका... ही याचिका फेटाळली...

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) ३१ मे - सोशल मीडियावर अत्यंत चर्चिलेल्या 'कॉक्रोच जनता पार्टी' या हँडलवरील बंदी उठवण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. हे सोशल मीडिया हँडल पुन्हा सुरू करून मिळावे, यासाठी हँडल निर्माते अभिजित दिपके यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार यावर आपली अधिकृत बाजू मांडत नाही, तोपर्यंत हे हँडल बंदच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश पुरुषेन्द्र कुमार कौरव यांनी संबंधित हँडलमधील काही मजकूर आणि बाबी आक्षेपार्ह असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले.

Advertisement

केंद्र सरकार आणि 'X' प्लॅटफॉर्मची बाजू ऐकणार
सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, "हँडल बंद करण्याच्या या मुद्द्यावर काही कायदेशीर आणि तांत्रिक गोष्टींचा सखोल विचार करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकार आणि 'X' (पूर्वीचे ट्विटर) प्लॅटफॉर्म यांची बाजू ऐकून घेणे आवश्यक आहे." त्यानुसार न्यायालयाने आता केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, त्यांचे उत्तर आल्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

राष्ट्रीय सुरक्षेचे कारण 
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत गेल्या २१ मे २०२६ पासून 'कॉक्रोच जनता पार्टी' या सोशल मीडिया हँडलवर संपूर्ण बंदी घातली आहे. हे हँडल राजकीय उपरोध आणि उपहासात्मक (Sarcasm) मजकुरासाठी ओळखले जात होते. मात्र, त्यातील काही गोष्टी संवेदनशील ठरल्याने सरकारने ही कारवाई केली होती. आता या प्रकरणाचा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात असून, सरकारच्या उत्तरानंतरच या 'झुराळां'चे भवितव्य ठरणार आहे.

Comments

No comments yet.