'नंदिनी'चा महास्वच्छता यज्ञ... पद्मश्री राहीबाई यांची बीजतुला... नाशकात या दिवशी भरगच्च कार्यक्रम...

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मे - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येत्या ५ जून रोजी नाशिकमध्ये 'नंदिनी' नदी स्वच्छतेचा महा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या "उन्नत नाशिक अभियान" अंतर्गत हा उपक्रम होत आहे. या महास्वच्छता मोहिमेच्या नियोजनासाठी महापौर हिंमगौरीताई आडके यांच्या उपस्थितीत आज पालिकेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीस विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, चित्राताई तांदळे, राजेश पंडित, अमित कुलकर्णी, चंद्रकिशोर पाटील, मनोज साठे, प्रवीण ठाकूर, सोमनाथ मुठाळ, हर्षल आहेर, प्रतीक राजपूत, निशिकांत पगारे, निलेश जवर, सागर बैरागी, प्रणाम्य ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

नदीच्या उगमापासून संगमापर्यंत १० टप्प्यांत स्वच्छता
नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी संपूर्ण नदी क्षेत्राचे १० टप्पे (झोन) करण्यात आले आहेत. कोणत्या टप्प्यात कोणत्या संस्थेने आणि नागरिकांनी स्वच्छतेची जबाबदारी सांभाळायची, याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, भूप्रहरी आणि स्वयंसेवी संस्था या मोहिमेत मोठ्या संख्येने श्रमदान करणार आहेत.

Advertisement

कार्यक्रमाची प्रमुख आकर्षणे
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची अनोखी 'बीजतुला':
या उपक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे देशी बियाण्यांचे जतन करणाऱ्या पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांची होणारी 'बीजतुला'. नाशिकमधील विविध संस्था आणि नागरिकांनी संकलित केलेल्या देशी वाणांच्या बियाण्यांद्वारे राहीबाईंची वजन केले जाईल. ही बियाणी नंतर शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांना वितरित केली जातील.
१० हजार सीड बॉलचे उद्दिष्ट:
संकलित बियाण्यांपासून तब्बल १० हजार 'सीड बॉल' (बियांचे गोळे) तयार केले जाणार आहेत. पावसाळ्यात हे सीड बॉल विविध टेकड्यांवर व परिसरात टाकून नैसर्गिक पद्धतीने वृक्षसंवर्धनाला चालना दिली जाईल. सध्या सातपूर येथील निसर्ग संवर्धन केंद्रात यासाठी बियाणे संकलन सुरू आहे.
अद्ययावत मधमाशी संवर्धन केंद्र:
पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांच्या संरक्षणासाठी नाशिकमध्ये विशेष मधमाशी संवर्धन केंद्राचे उद्घाटन केले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे डॉ. तुकाराम निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा पथदर्शी प्रकल्प साकारत आहे.
'क्यूआर कोड'द्वारे नोंदणीचे आवाहन
"स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिकसाठी नागरिकांनी या लोकचळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नागरिकांना या मोहिमेत सहभागी होता यावे यासाठी *विशेष क्यूआर कोड (QR Code)*द्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे."
— गिरीश महाजन, मंत्री, महाराष्ट्र राज्य

नाशिककरांना आवाहन: आपल्या भागातील देशी बियाणे संकलित करून सातपूरच्या केंद्रात जमा करावे आणि ५ जून रोजी होणाऱ्या नंदिनी नदीच्या महास्वच्छता अभियानात प्रत्यक्ष श्रमदानासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक महानगरपालिका आणि संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.