भोंदूबाबा कमलेश महाराजचा 'अघोरी' विळखा... स्मशानात पूजा आणि पशुबळी देत लाखो उकळले... आणखी ६ गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 31-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३१ मे - सोलापूरमधील दोन भावांना मृत्यूची भीती दाखवून त्यांची दोन एकर जमीन आणि दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. या भोंदूबाबाविरोधात काल आणखी सहा पीडितांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. 'अंनिस'च्या (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती) पुढाकारामुळे या तक्रारी समोर आल्या असून, यामुळे बाबाविरोधातील दोषारोपपत्र (चार्जशीट) अधिक मजबूत होईल, असा विश्वास अंनिसने व्यक्त केला आहे.

उघडकीस आलेले फसवणुकीचे धक्कादायक प्रकार:
नव्याने दाखल झालेल्या तक्रारींवरून भोंदूबाबाने पुणे, अहिल्यानगर आणि बीडमधील भाविकांना कसे जाळ्यात ओढले, हे समोर आले आहे:
स्मशानात अघोरी पूजा आणि पशुबळी (पुणे): लोहगाव (पुणे) येथील रत्ना अशोक पाटील या महिलेला शारीरिक त्रास होता. तो दूर करण्यासाठी तंत्रविद्या करावी लागेल, असे सांगून बाबाने त्यांना उज्जैनला नेले. तिथे स्मशानात अघोरी पूजा करत आणि पशुबळी देत तब्बल ४ लाख रुपये उकळले. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाला विमानाने कोलकाता येथे नेऊन महाकाली मंदिरात अघोरी पूजा करायला लावून त्याचा सर्व खर्चही स्वतःच वसूल केला.

Advertisement

यूट्यूब पाहून आले आणि ७ लाख गमावले (अहिल्यानगर): जिल्ह्यातील भगीरथ भगवान कटके यांनी भोंदूबाबाचे 'यूट्यूब चॅनेल' पाहून नाशिक गाठले होते. बाबाने त्यांना 'पितृदोष' असल्याचे सांगत भीती घातली. नाशिक आणि उज्जैन येथे होमहवन करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ७ लाख रुपये लाटले.
ट्रस्टचे सदस्यत्व देऊन फसवणूक (बीड): बीडचे संजय साहेबराव झेंडे यांनाही पितृदोषाची भीती दाखवून पूजेसाठी २१ हजार रुपये घेतले व पुढे आणखी २ लाख रुपयांची मागणी केली. बाबाने त्यांना स्वतःच्या 'महाधिविद्यान विद्या ट्रस्ट'मध्ये सदस्य करून घेतले होते. मात्र, बाबाचे काळे कारनामे लक्षात येताच त्यांनी राजीनामा दिला.
याशिवाय मुंबई येथील संजयभाई मखवाणाजी, दर्जीभाई व इतरांचेही जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.

'अंनिस'चा पाठपुरावा; पोलिसांचे आवाहन
या भोंदूबाबाचा पर्दाफाश करण्यासाठी अंनिसचे राज्य सरचिटणीस कृष्णा चांदगुडे, व्ही. टी. जाधव, राजेंद्र दरोडे आणि अ‍ॅड. बाबासाहेब ननावरे आदींनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. सध्या इंदिरानगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण सोनार या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
आवाहन: भोंदूबाबा कमलेश महाराजकडून अशीच फसवणूक झालेले आणखी कोणी पीडित असतील, तर त्यांनी न भीता तातडीने इंदिरानगर पोलिस किंवा अंनिसशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.