शेगाव, (प्रतिनिधी) ३१ मे - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विदर्भातील संतनगरी शेगाव आणि मराठवाड्यातील शिर्डी या दोन्ही प्रमुख धार्मिक स्थळांवर आता भाविकांना अत्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्नपदार्थ मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'फूड स्ट्रीट योजने' अंतर्गत या दोन्ही शहरांमध्ये 'फूड स्ट्रीट हब' (Food Street Hub) उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून दोन्ही स्थळांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचा, म्हणजेच एकूण २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील १०० प्रमुख ठिकाणी ही योजना राबवली जात असून, त्यात महाराष्ट्रातील या दोन पवित्र स्थळांचा समावेश करण्यात आला आहे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थांमुळे होणाऱ्या आजारांना बसणार चाप
अनेकदा रस्त्यावरील उघड्या आणि अस्वच्छ खाद्यपदार्थांमुळे नागरिकांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) होणे किंवा इतर आजार होण्याचा धोका असतो. हे रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात अन्न हाताळणीची सुरक्षित मानके लागू केली आहेत. या अंतर्गत 'विदर्भाची पंढरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आणि शिर्डीत साईबाबांच्या भक्तांना आधुनिक, स्वच्छ आणि आरोग्यासाठी सुरक्षित असणारे "आरोग्यदायी फूड स्ट्रीट" सेवा म्हणून उपलब्ध करून दिले जाणार आहे.
लघु व्यावसायिकांना हक्काचा रोजगार
या फूड स्ट्रीट हबच्या माध्यमातून केवळ भाविकांनाच चांगल्या दर्जाचे अन्न मिळणार नाही, तर स्थानिक पातळीवरील लहान खाद्य विक्रेते आणि लघु व्यावसायिकांना हक्काचा रोजगार मिळून त्यांच्या व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.
"महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या अशा शेगाव आणि शिर्डी या दोन्ही धार्मिक स्थळांवर हे आधुनिक फूड स्ट्रीट हब मंजूर करून भाविकांना मोठी भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो," अशी भावना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.