'आज तुम्हाला कापून टाकतो...' चालत्या गाडीत थरार... ७ कामगार महिलांचा विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 30-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० मे - शहरातील एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या तब्बल सात महिला कामगारांचा विनयभंग करून त्यांना चाकूचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आडगाव शिवारात उघडकीस आला आहे. संशयित वाहन चालकाने महिलांना घाबरवण्यासाठी चालत्या वाहनात धारदार चाकू फिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. दानिश सय्यद (रा. मोरे मळा परिसर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधम चालकाचे नाव आहे.

मैत्री करण्यासाठी अट्टाहास आणि अश्लील शिवीगाळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील सात महिला एका फायनान्स कंपनीत एकत्र काम करतात. संशयित दानिश सय्यद हा या महिलांना एका खाजगी वाहनातून कामावर ने-आण करण्याचे काम करत होता. गुरुवारी (दि. २८ मे) दुपारी या सर्व महिला नेहमीप्रमाणे त्याच्या वाहनातून प्रवास करत होत्या.

प्रवासादरम्यान, महिलांनी आपल्याशी मैत्री करावी या विकृत हेतूने दानिशने एका महिलेला जबरदस्तीने चालकाच्या शेजारच्या सीटवर बसण्यास सांगितले. महिलेने याला स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने संशयित दानिशने सर्व महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

'आज तुम्हाला कापून टाकतो...' चालत्या गाडीत थरार

Advertisement

महिलांनी विरोध करताच संशयिताने वाहनाचा वेग कमालीचा वाढवला. "आज तुम्हाला कापूनच टाकतो," अशी उघड धमकी देत त्याने हातातील धारदार चाकू हवेत फिरवून सर्व महिलांना गाडीतच ओलीस ठेवल्यासारखी परिस्थिती निर्माण केली. यामुळे गाडीतील महिला प्रचंड घाबरल्या.

पुढे वाहन नांदूर रस्त्यावर आले असता, घाबरलेल्या महिला तातडीने वाहनातून खाली उतरल्या. मात्र, संशयित दानिश तिथेच थांबला नाही, तर त्याने गाडीतून उतरून जाहीरपणे पुन्हा चाकूचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

"३५० वर्षांपूर्वीचा राग काढायचा होता!" आरोपीच्या जबाबाने पोलीसही चक्रावले

या गंभीर घटनेनंतर आडगाव पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित दानिश सय्यद याला अटक केली. मात्र, अटकेनंतर पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने दिलेला जबाब ऐकून पोलीसही चक्रावून गेले. "मला ३५० वर्षांपूर्वीचा राग काढायचा होता, म्हणून मी हे कृत्य केले," असा खळबळजनक आणि विचित्र खुलासा त्याने पोलिसांसमोर केला. आरोपीच्या या अजब दाव्यामुळे पोलीसही थक्क झाले असून, त्याची मानसिक स्थिती ठीक आहे का, याचाही तपास आता केला जाण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास आडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करत आहेत.

Comments

No comments yet.