चिमुरड्या 'संगीता'ला आहे पालकांची प्रतीक्षा... नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पोलिसांना सापडली...

Share:
Main Image
Last updated: 30-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३० मे - नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात काही महिन्यांपूर्वी विनापालक आढळून आलेल्या एका ९ वर्षीय चिमुरडीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने आवाहन केले आहे. या बालिकेला सध्या बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार नाशिकमधील बालगृहात ठेवण्यात आले असून, तिच्या पालकांनी किंवा नातेवाईकांनी तात्काळ संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रक जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी जारी केले आहे.

रेल्वे पोलिसांना सापडली होती बालिका

शासकीय माहितीनुसार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी ही नऊ वर्षांची बालिका नाशिक रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकटीच, विनापालक फिरताना आढळून आली होती. रेल्वे पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती, नाशिक यांच्यासमोर हजर केले होते. समितीच्या आदेशान्वये या बालिकेला काळजी आणि संरक्षणासाठी 'आधाराश्रम बालगृह संस्था, नाशिक' येथे दाखल करण्यात आले आहे. बाल कल्याण समितीने या बालिकेचे नाव 'संगिता' असे ठेवले आहे.

३० दिवसांची मुदत; अन्यथा पुढील पुनर्वसन

बालिकेच्या सुरक्षित भविष्याचा विचार करता, तिचे खरे आई-वडील किंवा नातेवाईक यांनी पुढे येऊन तिची ओळख पटवणे आवश्यक आहे. ही माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जर बालिकेवर हक्क सांगण्यासाठी किंवा तिचा शोध घेत कोणीही आले नाही, तर कायद्यानुसार संबंधित बालिकेला पालक नसल्याचे (अनाथ) गृहीत धरले जाईल. त्यानंतर बाल कल्याण समितीमार्फत तिच्या पुढील शासकीय पुनर्वसनाचा (दत्तक प्रक्रिया किंवा दीर्घकालीन संगोपन) विचार केला जाईल, असे सुनील दुसाने यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

संपर्क साधण्यासाठी पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक:

जर कोणाकडे या बालिकेच्या नातेवाईकांबाबत काही माहिती असेल किंवा तिच्या पालकांना संपर्क करायचा असेल, तर त्यांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

आधाराश्रम बालगृह, नाशिक: ०२५३-२५८०३०९ / २९५०३०९

जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नाशिक: समाजकल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक.

दूरध्वनी: ०२५३-२२३६३६८ / २९९१२९४

Advertisement

Comments

No comments yet.