मुंबई, (प्रतिनिधी) ३० मे - राज्यातील अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने संपूर्ण राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती आणि 'मिसब्रँडेड' औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेत प्रामुख्याने योगगुरू बाबा रामदेव यांच्या हरिद्वार येथील 'मे. दिव्या फार्मसी'च्या उत्पादनांवर मोठी कारवाई करण्यात आली असून, ७ जिल्ह्यांमधील १२ आयुर्वेदिक औषधविक्री आस्थापनांमधून तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. 'औषधे व जादूटोणा विरोधी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४' आणि 'औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०' च्या उल्लंघनाप्रकरणी ही कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही!
"जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक व दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणे आणि अवैध औषध उत्पादन व विक्रीविरुद्धची कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल," असा थेट आणि कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सुरक्षित अन्न आणि औषध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरातील विभागनिहाय जप्तीची आकडेवारी:
सह आयुक्त (औषधे) गणेश रा. रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या विभागांमध्ये विशेष मोहीम राबवून खालीलप्रमाणे जप्ती करण्यात आली:
कोकण विभाग: दिव्या फार्मसीचा सर्वाधिक म्हणजेच रु. १८,५८,०००/- चा साठा जप्त.
पुणे विभाग: दिव्या फार्मसीचा रु. १४,६८,९८१/- चा साठा, तसेच तपासणीदरम्यान आढळलेल्या २ अॅलोपॅथी मिसब्रँडेड औषधांचा तब्बल रु. २१,८३,४२८/- चा साठा जप्त.
नागपूर: दिव्या फार्मसीच्याu उत्पादनांचा रु. ७,२६,७५५/- चा साठा जप्त.
नाशिक: उत्पादकाचा एकूण रु. ७,१०,९४५/- किंमतीचा औषध साठा जप्त.
बृहन्मुंबई: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रु. १,८५,६००/- किमतीचा साठा जप्त.
अमरावती व छत्रपती संभाजीनगर: अनुक्रमे रु. १,४२,२२९/- आणि रु. ४८,७१८/- किमतीचा साठा औषध निरीक्षकांनी जप्त केला.
'सेल्फ मेडिकेशन' टाळा; तक्रारदारांचे नाव गोपनीय राहणार
औषधांवर असलेल्या भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवून स्वतः च्या मनाने औषधांचे (Self-Medication) सेवन करू नये, यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे. औषधांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी त्वरित एफडीएकडे तक्रार करावी. तक्रारदारांचे नाव आणि पत्ता पूर्णपणे गोपनीय ठेवला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.
लवकरच नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक
नागरिकांना तक्रार करणे सोपे व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे लवकरच एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात येणार आहे. तसेच एक टोल-फ्री क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात आला आहे, ज्याच्या माध्यमातून नागरिक अवैध औषध साठवणूक आणि भ्रामक जाहिरातींबाबत माहिती देऊ शकतील.