नाशिक, (प्रतिनिधी ) २९ मे - "आमच्याकडे खुन्नस देऊन का बघतो?" अशी क्षुल्लक कुरापत काढून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पंचवटीतील काट्यामारुती चौकात घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुद्वारा रोडवरील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय बैरागी, दीपक बैरागी (दोघे रा. वाघाडी, पंचवटी) आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रशांत उर्फ सोनू कमलाकर सुपे (रा. कालिकानगर, दिंडोरी रोड, नाशिक) या २४ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. सोनू सुपे हा बुधवारी (दि. २७ मे) रात्री नेहमीप्रमाणे काट्यामारुती चौक भागात गेला होता. तेथील गुरुद्वारा रोडवर तो त्याचा मित्र सनी लोणकर याच्याशी गप्पा मारत उभा होता.
अचानक गाठून केला हल्ला
सोनू आणि त्याचा मित्र गप्पा मारत असतानाच, तिथून जाणाऱ्या संशयित बैरागी बंधूंनी आणि त्यांच्या साथीदाराने सोनुला अचानक गाठले. "तू आमच्याकडे खुन्नसने का पाहतोस?" असे म्हणत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. सोनू काही समजण्याच्या आतच या तिघांच्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हा वाद इतका वाढला की, संशयितांपैकी एकाने जवळ असलेले धारदार शस्त्र काढून सोनूवर सपासप वार केले.
पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोनुला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीची वेळ असल्याने आणि टोळक्याच्या हातात शस्त्र असल्याने नागरिक भयभीत झाले होते. संधी साधून संशयित हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. जखमी सोनुला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.