नाशिकमध्ये 'बंटी-बबली'चा कारनामा... दांपत्याने मारला साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला...

Share:
Main Image
Last updated: 29-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ मे - गेल्या अनेक दिवसांपासून घरात विश्वासाने काम करणाऱ्या एका नोकर दांपत्यानेच मालकाचा विश्वासघात करत कपाटातील साडेतीन लाख रुपयांच्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर रोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी घरमालक महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, पोलिसांनी संशयित 'बंटी-बबली'विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

धुळ्याचे संशयित दांपत्य पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित बेलदार व कोमल बेलदार (रा. भाटपुरा, धुळे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित नोकर दांपत्याचे नाव आहे. याप्रकरणी चारूशिला विपुल लाठी (रा. द इम्पेरिअल, पाम शेल्स रिसोर्ट शेजारी, दत्त मंदिर चौक, गंगापूर रोड, नाशिक) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विश्वासाचा घेतला गैरफायदा

Advertisement

लाठी कुटुंबीय हे व्यावसायिक असून संशयित बेलदार दांपत्य त्यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून घरकामासाठी होते. अत्यंत विश्वासू आणि जुने असल्याने लाठी यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या या दांपत्यावर सोपवल्या होत्या. कुटुंबीय दिवसभर व्यवसायानिमित्त घराबाहेर राहत असत. हीच संधी साधून भामट्या दाम्पत्याने घरफोडीचा कट रचला.

सोन्यासह हिरेजडीत अलंकारांची चोरी

दि. १९ ते २६ मे दरम्यान लाठी कुटुंबीय घराबाहेर असताना, घरात कोणीही नसल्याची संधी साधत बेलदार दांपत्याने बेडरूममधील कपाटाचे कुलूप कौशल्याने उघडून आत ठेवलेले ३ लाख ५८ हजार रुपये किमतीचे मौल्यवान अलंकार चोरून नेले. यामध्ये सोन्याची साखळी, ब्रेसलेट, अंगठी, सोन्याचे कडे आणि महागड्या हिरेजडीत सोन्याच्या अलंकारांचा समावेश आहे.

कुटुंबीय घरी परतल्यानंतर कपाटातील दागिने गायब असल्याचे आणि दांपत्यही बेपत्ता असल्याचे लक्षात येताच लाठी यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात घरकाम करणाऱ्या नोकरांची पार्श्वभूमी तपासण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे हवालदार राकेश शिंदे करत आहेत.

Comments

No comments yet.