रेल्वे स्टेशनबाहेर थरारक छापा... कफ सिरपच्या ७,५०० बाटल्यांसह ट्रक जप्त, दोघांना बेड्या...

Share:
Main Image
Last updated: 29-May-2026

नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २९ मे - देशांतर्गत मादक आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात 'डीआरआय'ने (महसूल गुप्तचर संचालनालय) एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. एका विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पाटणा येथील राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्थानक परिसराबाहेर सापळा रचून कोडीन आधारित कफ सिरपच्या तब्बल ७,५०० बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला पिकअप ट्रकही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २६ मे २०२६ रोजी करण्यात आली.

​बोगस कंपनी आणि रद्द परवान्याचा खेळ उघड

​राजेंद्रनगर रेल्वे स्थानकाबाहेर डीआरआयच्या पथकाने एक संशयास्पद 'टाटा इंट्रा' पिकअप ट्रक अडवला. त्याची झडती घेतली असता, त्यात कोडीन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडाइन हायड्रोक्लोराइड सिरपचा (ESkuf) मोठा साठा आढळून आला.

​घटनास्थळावरून अधिकाऱ्यांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांनी कारवाई टाळण्यासाठी कफ सिरपच्या बोगस पावत्या आणि 'कंसाइनमेंट नोट' सादर केली. मात्र, डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या पावत्यांची आणि दिलेल्या पत्त्याची पडताळणी केली असता, एक मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. ज्या कंपनीच्या नावावर हा माल जात होता, त्या कंपनीचा औषध परवाना (Drug License) आधीच रद्द करण्यात आला होता, तसेच कागदपत्रांवर दिलेल्या पत्त्यावर अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नव्हती.

Advertisement

​एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये अटकेची कारवाई

​हा माल अंमली पदार्थांच्या छुप्या तस्करीचा भाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, डीआरआयने ७,५०० कफ सिरपच्या बाटल्या आणि वाहन ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजेच 'एनडीपीएस (NDPS) कायदा, १९८५' च्या विविध कडक कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

​आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता

​"मादक पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांच्या सीमापार तसेच देशांतर्गत होणाऱ्या छुप्या तस्करीला आळा घालण्यासाठी डीआरआय सातत्याने मोहीम राबवत आहे. या कारवाईनंतर आता या पुरवठा साखळीचे (Supply Chain) मूळ शोधणे, यातील आर्थिक व्यवहार तपासणे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या बोगस कंपन्या किंवा व्यक्ती सामील आहेत का, याचा पुढील तपास वेगाने सुरू आहे."

— डीआरआय (Revenue Intelligence) प्रशासन

Comments

No comments yet.