ठाणे, (विशेष प्रतिनिधी) २९ मे - ठाणे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली आहे. धडक आणि कडक शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले 'एफडीए' आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली २७ मे २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यात एक विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत विविध अन्न आस्थापनांची तपासणी करून ७ लाख ३० हजार रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
तब्बल ७.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ठाणे शहर आणि परिसरातील विविध दुकाने, हॉटेल्स आणि गोदामांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद अन्नपदार्थ जप्त केले. यामध्ये खालील अन्नपदार्थांचा समावेश आहे:
खाद्यतेल: १ लाख ४९ हजार ७२४ रुपये.
तूप: २ लाख ६ हजार ८०० रुपये.
डिंक (गम अरेबिक): १ लाख ९७ हजार ६४० रुपये.
फरसाण: ९३ हजार ८३० रुपये.
शरबत: ५४ हजार ९६ रुपये.
ताडी व हक्का नुडल्स: अनुक्रमे १७ हजार १०० रुपये आणि ८ हजार १९० रुपये.
प्रतिबंधित पदार्थ विकणारे ६ आरोपी जेरबंद
संशयास्पद साठ्याव्यतिरिक्त, बाजारात प्रतिबंधित असलेल्या अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या ६ व्यावसायिकांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. या आरोपींकडून ४ लाख ५३ हजार ३४४ रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पोलीस आणि एफडीए या दोन्ही यंत्रणांकडून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
नियमांचे पालन करण्याचे कडक आवाहन
अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालक, मिठाई विक्रेते, किराणा दुकानदार आणि अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. ग्राहकांना दर्जेदार अन्नपदार्थ मिळणे हा त्यांचा हक्क असून, स्वयंपाकघर आणि परिसरात स्वच्छता न राखणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
...तर नागरिकांनी 'येथे' तक्रार करावी!
"सार्वजनिक आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत, भेसळीबाबत किंवा स्वच्छतेबाबत काहीही शंका अथवा तक्रार असल्यास त्यांनी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. तसेच वागळे इस्टेट, ठाणे येथील सह आयुक्त कार्यालयात लेखी तक्रार नोंदवावी. नागरिकांचे नाव गुप्त ठेवले जाईल."
— अन्न व औषध प्रशासन, ठाणे
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे ठाण्यातील भेसळदार आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या अन्न व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, नागरिकांमधून मात्र या धडक कारवाईचे मोठे स्वागत होत आहे.