धक्कादायक... पामोलीन तेलाचा वापर करून बनवले जात होते दूध... असा झाला भांडाफोड...

Share:
Main Image
Last updated: 28-May-2026

जळगाव, (प्रतिनिधी) २८ मे - जिल्ह्यात बनावट दूध आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी मोहीम उघडली आहे. जळगाव कार्यालयाच्या पथकाने धरणगाव तालुक्यातील भवरखेड येथे धाड टाकून बनावट दूध तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत तब्बल २६६ लिटर भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करण्यात आले. तर दुसऱ्या एका कारवाईत जळगाव जवळील भोकर येथील एका रेस्टॉरंटमधून संशयास्पद अन्न नमुने जप्त करण्यात आले आहेत.

खाद्यतेलाचा वापर करून बनवले जात होते दूध!

भवरखेड येथे बनावट दूध तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या आधारे २७ मे रोजी पथकाने भवरखेड येथे छापा टाकला. यावेळी सोमनाथ आनंदा माळी (वय ३०) हा इसम दुधातील वसा (फॅट) वाढवण्यासाठी 'रिफाइन्ड पामोलीन तेलाचा' वापर करून बनावट दूध तयार करताना रंगेहात पकडला गेला. पथकाने घटनास्थळावरून गाईच्या दुधाचे आणि खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. उर्वरित २६६ लिटर भेसळयुक्त दूध भवरखेडच्या पोलीस पाटील रेखा नंदकिशोर पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आले.

आरोपी पोलिसांना चकवा देऊन पसार

कारवाई सुरू असतानाच आरोपी सोमनाथ माळी हा लघुशंकेचे बहाणा करून घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वी २९ जुलै २०२५ रोजीही दुध भेसळप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तो सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

'श्री चक्रधर रेस्टॉरंट'वर अचानक तपासणी; अन्न नमुने जप्त

दुसऱ्या एका कारवाईत, जळगाव तालुक्यातील मु. पो. भोकर येथील “श्री चक्रधर रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स” या हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक तपासणी केली. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. हॉटेलमधून दोन अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी जप्त करण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक आयुक्त स. कृ. कांबळे यांनी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

या दोन्ही कारवाया अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) तसेच नाशिक विभागाचे सह आयुक्त एस. आर. करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. कारवाईत जळगावचे सहायक आयुक्त दीनानाथ शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे, शरद पवार आणि आकाश बोहाडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

नागरिकांनो, भेसळीविरुद्ध येथे तक्रार करा!

परिसरात कुठेही बनावट दूध किंवा अन्न पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहावे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा acfdajalgaon@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments

No comments yet.