खासगीपेक्षा सरकारी कंपन्यांचे डिझेल इतक्या रुपयांनी स्वस्त... इंधनप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांना हे नवे निर्देश...

Share:
Main Image
Last updated: 28-May-2026

मुंबई, (विशेष प्रतिनिधी) २८ मे - पश्चिम आशियातील भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असला, तरी महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा (LPG) पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून इंधनाची साठेबाजी करू नये किंवा घाबरून खरेदी करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (IOCL, BPCL, HPCL) केले आहे. राज्यातील इंधन पुरवठ्यावर सरकारचे बारीक लक्ष असून, पेट्रोलियम पदार्थांचा काळाबाजार आणि अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष दक्षता पथके नेमून धाडी टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मागणीत अचानक का झाली वाढ?

तेल उद्योगांचे राज्यस्तरीय समन्वयक मिहीर गणेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ च्या पहिल्या तीन आठवड्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत पेट्रोलच्या मागणीत १८.५४% आणि डिझेलच्या मागणीत २२.३% ची लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढीमागे खालील प्रमुख कारणे आहेत:

१. कृषी हंगाम: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या शेतीची कामे वेगाने सुरू असल्याने इंधनाची मागणी वाढली आहे.

२. दरातील मोठी तफावत: खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारी पंपांवर पेट्रोल प्रतिलिटर ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांसाठी हा फरक प्रतिलिटर तब्बल ३० रुपये असल्याने सर्व ग्राहक सरकारी पंपांकडे वळले आहेत.

३. दरवाढीची भीती: आगामी काळात दर वाढतील या भीतीने अनेक ठिकाणी ग्राहक गरजेपेक्षा जास्त साठा करत आहेत.

मे २०२६ मधील मागणीतील वाढीचा तपशील

कालावधी / दिनांक पेट्रोल मागणीतील वाढ (%) डिझेल मागणीतील वाढ (%)

०१ ते २१ मे २०२६ १८.५४% २२.३%

२२ मे २०२६ १६% ४५%

Advertisement

२३ मे २०२६ २३% ५२%

२५ मे २०२६ १८% ५०%

२६ मे २०२६ १६% ३५%

(या कालावधीत तेल कंपन्यांनी एकूण ४०२ टीकेएल पेट्रोल आणि ७८९ टीकेएल डिझेलचा पुरवठा केला आहे.)

गॅस पुरवठा सुरक्षित; घरगुती एलपीजी थेट दारात

राज्यात सध्या २८,८८४ मेट्रिक टन एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून ग्राहकांनी बुकिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा, गॅस एजन्सींवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णालये, शाळा आणि सामाजिक संस्था यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांना १००% व्यावसायिक गॅस पुरवला जात आहे. तसेच स्थलांतरित मजुरांसाठी दररोज सरासरी २०,५८६ मोफत व्यापारी (FTL) सिलिंडरचे वितरण केले जात आहे.

पीएनजी जोडणीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी!

महाराष्ट्रात सध्या ४४ लाख पाईपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) जोडण्या असून, हे देशात सर्वाधिक ग्राहक असलेले राज्य ठरले आहे. विस्ताराला गती देण्यासाठी राज्य शासनाने प्रलंबित अर्जांना 'मानीव परवानगी' दिली असून, १ एप्रिल २०२६ पासून राज्यात १,०३,०९४ नवीन पीएनजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

तस्करांवर 'अत्यावश्यक वस्तू कायद्या'नुसार गुन्हा:

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा बेकायदेशीर वापर किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर 'अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५' अंतर्गत कठोर कारवाई सुरू झाली आहे. राज्य सरकारची भरारी पथके दररोज छापे टाकून अनधिकृत साठा जप्त करत असून तस्करांवर एफआयआर (FIR) दाखल केले जात आहेत.

Comments

No comments yet.