पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG सुद्धा महागला... पुणे आणि नाशिकमध्ये असे आहेत नवे दर...

Share:
Main Image
Last updated: 28-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) २८ मे - गेल्या १५ दिवसांत पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे चार मोठे झटके सहन कराव्या लागणाऱ्या सर्वसामान्यांना आता आणखी एक आर्थिक फटका बसला आहे. राज्यात सीएनजीच्या (CNG) दरात मोठी वाढ झाली असून, पुण्यात गुरुवारी सकाळपासून सीएनजी प्रति किलो २.५० रुपयांनी महागला आहे. तर नाशिकमध्येही प्रति किलो १.३५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे किफायतशीर पर्याय म्हणून सीएनजीकडे वळलेल्या वाहनधारकांनाही आता महागाईचा मोठा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

पुणे आणि परिसरात नवे दर लागू

पुण्यात झालेल्या २.५० रुपयांच्या दरवाढीमुळे आता सीएनजीचा दर ९४.८५ रुपये प्रति किलो झाला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर हे नवे दर गुरुवारपासून लागू झाले आहेत. चालू मे महिन्यातील ही दुसरी दरवाढ असून, यापूर्वी ९ मे रोजी सीएनजीचे दर १.५० रुपयांनी वाढले होते.

नाशिकमध्येही दरवाढ

नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात १.३५ रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी नाशिकमध्ये एक किलो सीएनजीसाठी ९५.१५ रुपये मोजावे लागत होते, तो दर आता ९६.५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर महाराष्ट्रातही सीएनजी महागणार अशी शक्यता वर्तवली जात होती, ती अखेर खरी ठरली आहे.

दरवाढीचे मुख्य कारण काय?

Advertisement

सीएनजी क्षेत्रासाठी लागणाऱ्या नैसर्गिक वायूच्या 'इनपूट कॉस्ट'मध्ये (उत्पादन खर्च) मोठी वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करावी लागल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्याचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होत आहे.

१० दिवसांत पेट्रोल ७.३८ रुपयांनी, तर डिझेल ७.०९ रुपयांनी महागले!

गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल चारवेळा वाढ झाली आहे. सोमवारी झालेल्या चौथ्या दरवाढीनुसार पेट्रोल २.६१ रुपयांनी आणि डिझेल २.१७ रुपयांनी महागले. गेल्या १० दिवसांचा विचार केला तर:

पेट्रोलमध्ये एकूण वाढ: ७ रुपये ३८ पैसे

डिझेलमध्ये एकूण वाढ: ७ रुपये ०९ पैसे

राज्यात डिझेलचा तुटवडा; शेतकरी रात्रभर रांगेत

एकीकडे इंधनाचे दर गगनाला भिडत असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. बुलढाणा, वाशिम आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना रात्र-रात्रभर पेट्रोल पंपांवर रांगा लावाव्या लागत असल्याचे भीषण चित्र समोर आले आहे.

Comments

No comments yet.