नाशिक, (प्रतिनिधी) २७ मे - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत पशुसंवर्धन विभागाच्या एका बड्या अधिकाऱ्याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) डॉ. प्रशांत रमेश धर्माधिकारी (वय ५८, रा. वाणर, पुणे, हल्ली रा. शिंगाडा तलाव, नाशिक) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वर्ग-१ च्या लोकसेवकाचे नाव आहे. एका गोशाळेच्या शासकीय अनुदानाच्या पडताळणी प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी डॉ. धर्माधिकारी यांनी लाचेची मागणी केली होती.
गोशाळेच्या अनुदानासाठी अडवणूक
लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे 'श्री संत जनार्दन स्वामी सेवा संस्कारित संस्था' संचलित 'मौनगिरी गोशाळेचे' ट्रस्टी आहेत. या गोशाळेत ७० गायी असून, त्यांच्या संगोपनासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिपोषण योजनेअंतर्गत अनुदान मिळत असते. या गोशाळेला २७ मार्च २०२६ रोजी ३ लाख ४४ हजार २५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान नियमानुसार योग्य प्रकारे खर्च झाले आहे की नाही, हे तपासून प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्याकडे होती.
४१ हजारांची मागणी; तडजोडीअंती ५ हजार स्वीकारताना ट्रॅप!
अनुदान पडताळणीच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी उपायुक्त डॉ. धर्माधिकारी यांनी तक्रारदाराकडे थेट ४१,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, काल दिनांक २६ मे २०२६ रोजी जिल्हा उपायुक्त कार्यालयातच एसीबीने सापळा (Trap) रचला. तक्रारदार आणि लाचखोर अधिकाऱ्यामध्ये झालेल्या तडजोडीअंती ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरले. डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांनी ही ५ हजार रुपयांची लाच जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय) कार्यालयात स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.
कारवाई करणारे 'एसीबी'चे पथक आणि पुढील प्रक्रिया
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू: या लाचखोरीप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात 'भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८' च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा अधिकारी व पथक: ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोहवा प्रफुल माळी आणि पोहवा विलास निकम यांच्या पथकाने केली.
तपासी अधिकारी: या गुन्ह्याचा पुढील तपास ला.प्र.वि. नाशिकच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती स्वाती पवार करत आहेत.
मार्गदर्शन: सदरची कारवाई ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.