नाशिक (प्रतिनिधी), २६ मे २०२६ -
नाशिक शहर आणि परिसरात महिला व मुलींवरील अत्याचाराचे सत्र थांबताना दिसत नाही. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या तीन वेगवेगळ्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एका विवाहितेचे नकळत अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत अनेक वर्षे बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. तर दुसऱ्या दोन घटनांमध्ये छतावर झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीचा आणि रस्त्याने जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयितांचा शोध सुरू आहे.
फोटोच्या जोरावर २०१३ पासून अत्याचार!
बलात्काराचा हा संतापजनक प्रकार नाशिक रोड परिसरातील जेलरोड भागात घडला. पीडित विवाहिता आपल्या घरात कपडे बदलत असताना संशयिताने तिचे नकळत फोटो काढले होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि पतीला दाखवण्याची धमकी देत संशयिताने नोव्हेंबर २०१३ पासून महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
या काळात संशयिताने पीडितेच्या घरात तसेच मुक्तिधाम परिसरातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केला. अलीकडच्या काळात संशयिताची मागणी अधिकच वाढल्याने पीडितेने त्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या संशयिताने महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली आणि तिचे अश्लील फोटो पतीला पाठवण्याची धमकी दिली. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने नाशिक रोड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करत आहेत.
मावशीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग
विनयभंगाची पहिली घटना जुने नाशिक येथील अमरधाम रोड भागात घडली. येथील मावशीच्या घरी पाहुणी म्हणून आलेली एक अल्पवयीन मुलगी सोमवारी (दि. २५ मे) रात्रीच्या सुमारास घराच्या टेरेसवर (छतावर) झोपली होती. यावेळी तिची एकट्याची गैरसोय साधून संशयित शेख सलीम मोहम्मद अलीम (रा. विजय ममता परिसर) याने टेरेसवर प्रवेश करत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक दहिफळे अधिक तपास करत आहेत.
भररस्त्यात महिलेची छेडछाड
दुसरी घटना बोधले नगर सिग्नल ते अशोका मार्ग दरम्यानच्या एसबीआय बँक परिसरात सोमवारी भरदुपारी घडली. एक महिला आपल्या लहान मुलांना आईस्क्रीम घेण्यासाठी रस्त्याने पायी जात असताना, सतीष विनायक सातदिवे (वय ४२) याने तिचा विनयभंग केला. या कृत्यासाठी त्याला त्याचे भाऊ शशिकांत सातदिवे आणि संतोष सातदिवे (सर्व रा. बाबासाहेब आंबेडकर वाडी, सिद्धार्थ हॉटेलसमोर) यांनी चिथावणी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार जाधव तपास करीत आहेत.