नाशिकच्या कॉलेज रोडवर विद्यार्थ्यांच्या रूममध्ये थरार... जबरी लूट आणि खंडणीची मागणी...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

 

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. २६ मे २०२६ -

शहरातील उच्चभ्रू आणि अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या कॉलेज रोड जवळील विसेमळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिक्षण घेण्यासाठी नाशिकमध्ये आलेल्या आणि रूम करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवत आणि मारहाण करत एका टोळक्याने सुमारे ७१ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून नेला. भामट्यांनी विद्यार्थ्यांचा महागडा मोबाईल आणि रोख रकमेसह ऑनलाईन पैसेही उकळले आहेत. इतकेच नव्हे, तर मोबाईल परत हवा असल्यास २५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ध्रुव वाघ, दुर्गेश पाटील, दिवेश पाटील, मनी पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित भामट्यांची नावे आहेत. याबाबत गौरव ज्ञानेश्वर महाजन (वय १८, मूळ रा. भडगाव, जि. जळगाव, हल्ली रा. निर्मल रत्न अपार्टमेंट, विसेमळा) या विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.

Advertisement

'त्या' जाड्या मुलाला बोलवा, नाहीतर...

गौरव महाजन, ध्रुवम देवरे, प्रेम पाटील आणि प्रज्वल मालपुरे हे परगावाहून नाशिकमध्ये शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी विसेमळा भागातील 'निर्मल रत्न अपार्टमेंट'मध्ये एकत्र रूम करून राहतात. गेल्या शुक्रवारी (दि. २२ मे) दुपारच्या सुमारास हे सर्व रूम पार्टनर खोलीत असताना संशयित टोळके तिथे आले. "आम्ही कार्तिक देवरेचे मित्र आहोत," असा बनाव करून ते घरात शिरले. त्यांनी "परवा तुमच्यासोबत जो जाड मुलगा होता, तो आम्हाला पाहिजे आहे," असे म्हणत दमदाटी सुरू केली. विद्यार्थ्यांनी त्या मुलाला बोलवण्यास नकार दिला असता, "त्याला नाही बोलावल्यास तुमचे मोबाईल घेऊन जाऊ," अशी धमकी देत संशयितांनी थेट चाकू बाहेर काढला आणि विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

बॅगांची झडती, आयफोनची लूट आणि खंडणीची मागणी

चाकूचा धाक दाखवून संशयितांनी विद्यार्थ्यांच्या बॅगांची संपूर्ण झडती घेतली आणि त्यातील रोख रक्कम काढून घेतली. तसेच ध्रुव देवरे याच्या हातातील महागडा आयफोन (iPhone) बळजबरीने हिसकावून घेतला. यानंतर या टोळक्याने विद्यार्थ्यांना इमारतीच्या खाली नेऊन पुन्हा मारहाण केली आणि "मोबाईल परत पाहिजे असल्यास २५ हजार रुपये द्यावे लागतील," अशी खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

बळजबरीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर आणि 'व्हिडिओ'चा बनाव

या लुटीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या खिशात पैसे न सापडल्याने, टोळक्याने त्याच्यावर दबाव आणून कार्तिक देवरे नावाच्या मुलाच्या फोनवर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले. आपली बाजू सुरक्षित करण्यासाठी या चलाख टोळक्याने "या विद्यार्थ्यांकडे आमची उधारी आहे," असा खोटा व्हिडिओ देखील बनवून घेतला. यानंतर संशयित त्यांच्या एमएच ४१ बीआर ६०२२ (MH 41 BR 6022) या क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीत आणि एका दुचाकीवर बसून पसार झाले. या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.

Comments

No comments yet.