दिंडोरी रोडवर भरधाव दुचाकी झाडावर आदळली... १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), दि. २६ मे २०२६ -

दिंडोरी रोडवरील करवली हॉटेल भागात रविवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात १९ वर्षीय दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळले. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला होता, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश यशवंत चौधरी (वय १९, रा. कुसमाडी, पो. दळवट, ता. कळवण) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नियंत्रण सुटल्याने काळाचा घाला

Advertisement

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील कुसमाडी येथील रहिवासी असलेला गणेश चौधरी हा तरुण रविवारी (दि. २४ मे) रात्रीच्या सुमारास दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान दिंडोरी रोडवरील करवली हॉटेल भागात आला असता, त्याच्या भरधाव दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे त्याची मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर प्रचंड वेगाने आदळली.

उपचारापूर्वीच प्राण ज्योत मालवली

या भीषण अपघातात गणेशच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने तो जागेवरच बेशुद्ध पडला होता. अपघाताची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे चालक शरद मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गणेशला अत्यंत गंभीर आणि बेशुद्ध अवस्थेत नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला उपचारापूर्वीच तपासून मृत घोषित केले. या अपघातामुळे कळवण आणि कुसमाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे हवालदार विजय गोसावी करत आहेत.

Comments

No comments yet.