मुंबई, (प्रतिनिधी) २६ मे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकउपयोगी कामांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सोशल मीडियावर 'टीम देवेंद्र' (Team Devendra) नावाचा अधिकृत ग्रुप सक्रिय आहे. मात्र, या नावाचा गैरफायदा उठवत काही भामट्यांनी थेट समांतर संघटना आणि मोबाईल ॲप (App) तयार करून बदल्या, बढत्या, नियुक्त्या आणि सरकारी कामांचे आमिष दाखवून आर्थिक देवाणघेवाण सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संपूर्ण प्रकरणाशी सोशल मीडियावरील अधिकृत 'टीम देवेंद्र'चा कोणताही संबंध नसून नागरिकांनी अशा भ्रामक प्रलोभनांना बळी पडू नये, असे जाहीर आवाहन अधिकृत पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून शासकीय यंत्रणेत हस्तक्षेपाचा हा गंभीर प्रयत्न असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
चौकशीत धक्कादायक खुलासा; मुख्यमंत्री कार्यालय अनभिज्ञ!
'टीम देवेंद्र'ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची किंवा त्यांची स्वतःची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ही बोगस संघटना आणि ॲप चालवले जात आहे.
प्राथमिक चौकशीत गणेश कराड नामक व्यक्तीमार्फत हे अनधिकृत प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
अत्यंत गंभीर बाब म्हणजे, या समांतर संघटना आणि ॲपबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO) सुद्धा कोणतीही माहिती नाही.
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, आता या बोगस यंत्रणेविरुद्ध मुख्यमंत्री कार्यालयामार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आर्थिक व्यवहारांना आम्ही जबाबदार नाही!
अधिकृत 'टीम देवेंद्र'ने स्पष्ट केले आहे की, आमच्या अधिकृत ग्रुपचे कार्यक्षेत्र हे केवळ सोशल मीडिया पुरतेच मर्यादित आहे. मुख्यमंत्र्यांच्या कामांचा प्रचार करणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट असून शासकीय यंत्रणेत किंवा प्रशासकीय बदल्यांमध्ये हस्तक्षेप करणे आमचे काम नाही. त्यामुळे गणेश कराड किंवा अशा अनधिकृत ग्रुपच्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहार, बदल्या आणि नियुक्त्यांच्या देवाणघेवाणीला भविष्यकाळात आम्ही अजिबात जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे