पेंग्विन नको, 'कॅपुचिन माकड' द्या... सिंहाच्या बदल्यात गुजरातची मागणी...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २६ मे - मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) लवकरच आशियाई सिंहाची जोडी दाखल होणार आहे. गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून हे सिंह मुंबईत आणले जाणार आहेत. मात्र, या सिंहांच्या बदल्यात गुजरात प्रशासनाने मुंबईकडे दक्षिण अमेरिकन प्रजातीचे 'कॅपुचिन माकड', जिराफ किंवा एकशिंगी गेंडा यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांची मागणी केली असून, यावर आता सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

'हम्बोल्ट पेंग्विन'चा प्रस्ताव का फेटाळला?
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या (CZA) नियमांनुसार, दोन राज्यांमध्ये प्राण्यांची देवाणघेवाण करताना समतुल्य (सारख्याच मूल्याचे किंवा महत्त्वाचे) प्राणी देणे बंधनकारक असते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीला गुजरातला राणीच्या बागेतील प्रसिद्ध 'हम्बोल्ट पेंग्विन' देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, पेंग्विनच्या देखभालीसाठी येणारा प्रचंड खर्च आणि गुजरातचे उष्ण हवामान यामुळे सक्करबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने मुंबईचा हा पेंग्विन देण्याचा प्रस्ताव नाकारला.

माकडाच्या बदल्यात सिंह; मुंबई मनपा सकारात्मक
पेंग्विनचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आता गुजरातने सिंहाच्या बदल्यात दक्षिण अमेरिकन प्रजातीचे 'कॅपुचिन माकड' किंवा जिराफ देण्याची नवी अट मुंबई मनपासमोर ठेवली आहे. मुंबईच्या राणीच्या बागेत सध्या अतिरिक्त कॅपुचिन माकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे गुजरातची ही नवी अट मान्य करण्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनात सकारात्मक चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी यावर अंतिम मंजुरी दिल्यानंतर, लवकरच मुंबईकरांना राणीच्या बागेत आशियाई सिंहाचे दर्शन घडणार आहे.

Comments

No comments yet.