गुप्तधनाच्या आमिषाने जळत्या चितेवर अघोरी पूजा...  भोंदूबाबा कमलेश अधिकारी दाम्पत्यावर गुन्हा दाखल...

Share:
Main Image
Last updated: 26-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ मे - नाशिक शहरासह इतर ठिकाणी आश्रम आणि मठ स्थापन करून, विविध समस्यांनी पीडित असलेल्या लोकांचे स्मशानात अघोरी पूजाविधी, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धायुक्त उपायांद्वारे आर्थिक व मानसिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी व त्याची साथीदार पत्नी गौरी अधिकारी यांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे या भोंदूगिरीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

मृत्यूची भीती आणि गुप्तधनाचा बनाव
सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन नवनाथ देवकर व ज्ञानेश्वर नवनाथ देवकर या दोन भावांच्या आई-वडिलांचे २०२१ मध्ये महिनाभराच्या अंतराने निधन झाले होते. या धक्क्यामुळे भीतीच्या सावटाखाली जगत असलेल्या दोन्ही भावांनी यावर उपाय शोधण्यासाठी यू-ट्यूबवर शोध घेतला असता, त्यांना नाशिकच्या पाथर्डी फाटा (खंडोबानगर) येथील भोंदूबाबा कमलेश अधिकारी याची माहिती मिळाली.

पीडित भावांनी नाशिक गाठल्यानंतर भोंदूबाबाने, "तुमच्या कुटुंबाचे मागच्या जन्मीचे पाप आहे, राहत असलेल्या जमिनीत दैवी दोष आणि गुप्तधनाचा साठा आहे. त्यावर असलेल्या अतृप्त आत्म्यांनीच तुमच्या आई-वडिलांचा बळी घेतला असून तुम्हा दोघांनाही लवकरच मृत्यूयोग आहे," अशी भयंकर भीती त्यांच्या मनात भरवली आणि त्यांच्या मनाचा ताबा घेतला.

Advertisement

जळत्या चितेवर अघोरी पूजा आणि पशू बळी
भोंदूबाबानं दोन्ही भावांना भुलथापा मारून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे बोलावून घेतले. तेथील स्मशानभूमीत जळत्या चितेवर चार दिवस अघोरी पूजा करत विविध पशूंचा बळी दिला आणि दैवी पूजेच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळले. त्यानंतर नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करून पशूंचा बळी दिला व त्यांना 'प्रसाद' म्हणून दारू दिली. एवढ्यावरच न थांबता त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात त्यांना बळजबरीने डांबून ठेवत घरगुती कामे करून घेतली. तसेच मठ बांधण्याच्या नावाखाली पीडितांची दोन एकर जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली. या सर्व प्रकारात भोंदूबाबाच्या पत्नीचाही सक्रिय सहभाग होता.

'अंनिस'चा तत्पर पाठपुरावा आणि पोलिसांची कारवाई
या छळाला कंटाळून सोलापूरच्या दोन्ही पीडित भावांनी नाशिक येथील 'अंनिस' कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी तात्काळ पीडितांना धीर देत इंदिरानगर पोलीस स्टेशन गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून भोंदू कमलेश अधिकारी आणि त्याच्या पत्नीविरोधात जादूटोणा विरोधी कायदा कलम २ (१) ख तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३१६(२), ३१८(२), १२७(२), १२८, ११५(२), ३५१(२), ६१, ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करत आहेत.

अंनिसचे आवाहन:
या भोंदूबाबाकडून अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक किंवा शोषण झाले असल्यास त्यांनी न भीता अंनिसशी (कृष्णा चांदगुडे: 9822630378) किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.

Comments

No comments yet.