उन्हाळी सुट्यांमध्ये घरफोड्या जोरात... रोकडसह सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला...

Share:
Main Image
Last updated: 25-May-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ मे - शहरात घरफोडी सत्राचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. नाशिकच्या चार वेगवेगळ्या भागांत झालेल्या घरफोडीच्या मोठ्या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल १३ लाख ३ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

१. आडगाव: कुलूप तोडून १ लाख ७० हजारांची चोरी
घरफोडीची पहिली घटना आडगाव परिसरातील होळी चौक येथे घडली. प्रतीक्षा सोमनाथ माळोदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. माळोदे कुटुंबिय शनिवारी (दि. २३) काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटातून ८० हजार रुपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार आहिरे पुढील तपास करत आहेत.

२. गोविंदनगर: बंद घर फोडून ४० हजारांचा ऐवज लंपास
दुसरी घटना मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोविंदनगर येथील वैभवलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये घडली. प्रदीप ओंकार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाटील कुटुंबिय गेल्या गुरुवारी (दि. २१) बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेली १० हजारांची रोकड व सोन्याची अंगठी असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हवालदार गोडे तपास करत आहेत.

Advertisement

३. सिडको: मालकाच्या अनुपस्थितीत भाडेकरूनेच साफ केले हात?
तिसरी आणि सर्वात मोठी घरफोडी सिडकोतील विजयनगर भागातील माताजी चौकात घडली. येथे घरमालकाचे घर परस्पर उघडून भाडेकरूनेच चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. जयेश नानासाहेब वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. २३) ते अल्पवेळेसाठी घराबाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्याने बंद घराचे कुलूप उघडून बेडरूममधील कपाटातून तब्बल ६ लाख ७३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे अलंकार लंपास केले. या चोरीत घराचा भाडेकरू पंकज कदम याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हवालदार देसले तपास करत आहेत.

४. देवळाली कॅम्प: ४ लाख २० हजारांचे दागिने चोरीला
चौथी घटना देवळाली कॅम्प परिसरातील कॅन्टोमेंट हॉस्पिटलसमोरील सुखसिंधू सोसायटीत घडली. घनश्याम नेभनदास चावला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही चोरी १४ एप्रिल ते ५ मे या दरम्यानच्या काळात झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात घुसून मोबाईल फोन आणि कपाटात ठेवलेले ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार गुंजाळ तपास करत आहेत.

नागरिकांना आवाहन: शहरात वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बाहेरगावी जाताना आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच शेजाऱ्यांना आणि स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.