नाशिक, (प्रतिनिधी) २५ मे - 'रोज काय भाजी करावी?' या घरगुती विवंचनेतून गुरुवारी बनवलेली कढी एका विवाहितेसाठी जीवघेणी ठरली आहे. जेवण आवडले नाही या किरकोळ कारणावरून संतप्त पतीने आपल्या ३४ वर्षीय पत्नीच्या अंगावर थेट उकळती कढी फेकल्याची धक्कादायक घटना कोणार्कनगर परिसरातील रुक्मिणी लॉन्स भागात घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात विवाहिता गंभीररीत्या भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सासूच्या चिथावणीमुळे कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३४ वर्षीय विवाहिता तिच्या पती आणि सासूसोबत रुक्मिणी लॉन्स परिसरात वास्तव्यास आहे. गुरुवारी (दि. २१) नेहमीप्रमाणे 'आज जेवणात काय बनवावे?' या विचारातून तिने रात्रीच्या जेवणासाठी कढी बनवली होती. रात्री पती घरी आल्यानंतर विवाहितेने कढी उकळवून जेवणाचे ताट वाढले. मात्र, ताटात फक्त कढी पाहताच पतीचा पारा चढला.
त्यातच सासूने देखील सुनेविरुद्ध पतीला चिथावणी दिली. सासूच्या चिथावणीमुळे पती आणखीनच हिंसक झाला आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरू झाला.
उकळत्या कढीची वाटी अंगावर भिरकावली
अमानुष मारहाण आणि हल्ला: वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित पतीने आधी पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच त्याचा राग शांत झाला नाही, तर त्याने गॅसवरून उतरवून आणलेली उकळत्या कढीची वाटी थेट पत्नीच्या दिशेने भिरकावली. उकळती कढी अंगावर पडल्याने विवाहिता गंभीररीत्या भाजली असून ती वेदनेने विव्हळत होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल
या अमानुष घटनेनंतर पीडित विवाहितेने दिलेल्या जबाबावरून आडगाव पोलीस ठाण्यात पती आणि सासूविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करत आहेत.